मेस्सीने गाठला 500 चा पल्ला; तरीही तो दुय्यमच!

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 4 January 2021

अर्जेंटिनाचा स्ट्रायकर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा मध्ये बार्सिलोना संघाकडून मैदानात उतरत आपला 500 वा सामना खेळला.

अर्जेंटिनाचा स्ट्रायकर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा मध्ये बार्सिलोना संघाकडून मैदानात उतरत आपला 500 वा सामना खेळला. फुटबॉल मधल्या सर्व स्पर्धांमध्ये क्लब कडून खेळताना लिओनेल मेस्सीचा हा 750 वा सामना होता. आज ला लिगा मध्ये बार्सिलोना आणि हुइस्का यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बार्सिलोना संघाने हुइस्कावर विजय मिळवला. 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

बार्सिलोना संघाकडून सर्वाधिक 500 सामने खेळणारा लिओनेल मेस्सी हा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी स्पेनच्या जेवीने बार्सिलोना संघाकडून 767 सामने खेळलेले आहेत. तर ला लिगा फुटबॉल लीग मध्ये सगळ्यात जास्त सामने खेळण्याचा विक्रम पूर्व गोलकिपर अँडोनी जुबीजारेटा यांच्या नावावर आहे. अँडोनी जुबीजारेटा यांनी एथलेटिक क्लब, बार्सिलोना आणि वेलेन्सिया या क्लबकडून खेळताना 662 सामने खेळलेले आहेत.       

बार्सिलोना आणि हुइस्का यांच्यात झालेल्या सामन्यात, बार्सिलोना संघाच्या फ्रँकी डी जोंग याने 27 व्या मिनिटाला पहिला गोल करत, संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर सामना संपेपर्यंत बार्सिलोना संघाने ही आघाडी टिकवून ठेवली. खेळाच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही पैकी एकाही संघाला गोल करता आला नाही. तर संपूर्ण सामन्यात हुइस्का संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे या सामन्यात बार्सिलोनाने हुइस्कावर 1 - 0 ने विजय मिळवला. तर हुइस्कासोबत झालेल्या या सामन्यात लिओनेल मेस्सीला गोल करता आला नाही. यानंतर बार्सिलोनाचा पुढील सामना एथलेटिक क्लबसोबत होणार आहे. 

दरम्यान, ला लिगाच्या क्रमवारीत ऍटलेटिको माद्रिदचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ऍटलेटिको माद्रिदच्या संघाने 15 सामन्यांपैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे या संघाचे 38 अंक आहेत. त्यानंतर रियल माद्रिदचा संघ 36 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रियल माद्रिदच्या संघाने 17 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तर रियल सोशियादाद संघाने 18 पैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आणि 30 गुणांसह हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय, व्हिललारियालचा संघ 29 अंकांसह चौथ्या आणि बार्सिलोनाचा संघ 28 अंकांसह पाचव्या स्थानावर आहे.        

 


​ ​

संबंधित बातम्या