लिओनेल मेस्सी बहरल्यावर त्याला रोखणे अवघड असते

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 July 2021

लिओनेल मेस्सी बहरल्यावर त्याला रोखणे अवघड असते, याची जाणीव इक्वेडोर फुटबॉल संघास तसेच कोपा अमेरिका स्पर्धेतील अर्जेंटिनाच्या प्रतिस्पर्धी संघांना पुन्हा झाली.

गोइआनिया (ब्राझील) - लिओनेल मेस्सी बहरल्यावर त्याला रोखणे अवघड असते, याची जाणीव इक्वेडोर फुटबॉल संघास तसेच कोपा अमेरिका स्पर्धेतील अर्जेंटिनाच्या प्रतिस्पर्धी संघांना पुन्हा झाली. अर्जेंटिनाने ३-० अशी बाजी मारत उपांत्य फेरीतील कोलंबियाविरुद्धची लढत निश्चित केली.

मेस्सीने पूर्वार्धात गोल करण्याची सुवर्ण संधी दवडली; पण त्यानंतर त्याची भरपाई करताना फ्री कीकवर गोल केला; तसेच दोन गोलात मोलाची कामगिरी बजावली. पूर्वार्ध तसेच उत्तरार्ध संपण्यास पाच मिनिटे असताना मेस्सीच्या अचूक पासवर प्रथम रॉद्रिगो डे पॉलने आणि त्यानंतर लॉरातो मार्टिनेझने गोल केला. 

मेस्सीने भरपाई वेळेत फ्री किक सत्कारणी लावली. फुटबॉल स्टार मेस्सीचे आता ७६ आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत. तो आता पेले यांच्या दक्षिण अमेरिकन विक्रमापासून एक गोल दूर आहे; पण मेस्सीने यास महत्त्व दिले नाही. संघाच्या कामगिरीपेक्षा कधीही वैयक्तिक विक्रम मोठे होत नाहीत. आम्ही येथे विक्रमासाठी नाही, तर अन्य उद्देशाने खेळत आहोत. त्यावर आमचे लक्ष पूर्ण केंद्रित आहे, असे मेस्सीने सांगितले.

इक्वेडोरने अर्जेंटिनाचा चांगलाच कस पाहिला. त्यातच मेस्सी केवळ गोलरक्षकास चकवण्यास अपयशी ठरल्याने अर्जेंटिना संघ निराश झाला; पण त्याची भरपाई करताना मेस्सीने गोलरक्षक आणि दोन बचावपटूंना चकवत दिलेला पास जबरदस्त होता. सामना संपण्यास पाच मिनिटे असताना मेस्सीकडे चेंडू असताना इक्वेडोर बचावपटूंनी त्याच्या भोवती जवळपास कडे केले होते; पण त्यातून त्याने अचूक पास दिला.


​ ​

संबंधित बातम्या