बार्सिलोनाकडे राहताना मेस्सीची मानधन कपात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 July 2021

लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील पाच वर्षांच्या नव्या करारावर लवकरच स्वाक्षरी होईल. नवा करार करताना मेस्सीने मानधन कपातीस संमती दाखवली असल्याचे समजते.

बार्सिलोना - लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील पाच वर्षांच्या नव्या करारावर लवकरच स्वाक्षरी होईल. नवा करार करताना मेस्सीने मानधन कपातीस संमती दाखवली असल्याचे समजते.

मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील यापूर्वीच्या करारानुसार मेस्सीला एक वर्ष अगोदर मुक्त होण्याची संधी होती; मात्र कोरोना महामारीमुळे मोसम लांबला आणि करारातील कलमावरून मेस्सी आणि बार्सिलोना क्लब यांच्यातील संघर्ष वाढला. त्या वेळी मेस्सी मँचेस्टर सिटी अथवा पीएसजीकडे जाणार असल्याची चर्चा होती; मात्र आता मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील करार ३० जून रोजी संपला आहे. त्यानंतरही मेस्सीची बार्सिलोना क्लबसह नव्या कराराबद्दल चर्चा सुरू आहे.

मेस्सीचा यापूर्वीचा करार चार वर्षांसाठी ५९ कोटी ४० लाख डॉलरचा होता. मेस्सी आणि क्लबचे नवे अध्यक्ष जोआन लोपार्तो यांचे संबंध चांगले आहेत; मात्र बार्सिलोना क्लबवर सध्या एक अब्ज युरोचे कर्ज आहे. त्यामुळे खेळाडूंच्या मानधनात कपात करण्याचे ठरले आहे. त्यामुळे मेस्सीनेही कमी रकमेच्या नव्या करारास मंजुरी दिल्याचे समजते.

बार्सिलोनाने खर्च कपात न केल्यास त्यांच्या खेळाडूंबरोबरील नव्या करारास मंजुरी देण्यात येणार नाही, असे ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग व्यवस्थापनाने सांगितले आहे. कोरोनामुळे बार्सिलोनास खेळाडूंच्या मानधनावरील खर्च ६० कोटी युरोवरून ३४ कोटी ७० लाख युरो करण्यास सांगितले आहे.

मेस्सीच नव्हे, तर सर्जिओ अॅग्यूएरा, मेम्फिस डेपे, एरिक गार्सिया, एमर्सन रॉयल यांचा करारही संपला आहे.


​ ​

संबंधित बातम्या