व्यावसायिक फुटबॉल : मेस्सीच्या विक्रमी सामन्यात बार्सिलोनाची पीछेहाट

संजय घारपुरे
Tuesday, 23 February 2021

मेस्सीने त्याच्या विक्रमी लढतीत गोल केला. या गोलच्या जोरावर बार्सिलोना विजय मिळवणार, असे वाटत असतानाच त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली. गोलच्या अनेक संधी दवडलेल्या बार्सिलोनाने अखेरच्या मिनिटात बरोबरीचा गोल स्वीकारावा लागला.

बार्सिलोना :  लिओनेल मेस्सीने 506  वी ला लिगा लढत खेळण्याचा विक्रम केला; पण या महत्त्वाच्या लढतीत मेस्सी संघाला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करू शकला नाही. घरच्या मैदानावरील कादीझविरुद्धच्या बरोबरीमुळे बार्सिलोना ला लिगा विजेतेपदापासून जास्तच दूर गेले.

मेस्सीने त्याच्या विक्रमी लढतीत गोल केला. या गोलच्या जोरावर बार्सिलोना विजय मिळवणार, असे वाटत असतानाच त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली. गोलच्या अनेक संधी दवडलेल्या बार्सिलोनाने अखेरच्या मिनिटात बरोबरीचा गोल स्वीकारावा लागला. आम्ही पिछाडी कमी करण्याची संधी सोडली आहे. स्पर्धेत सूर गवसला, असे वाटत असतानाच पीछेहाट झाली, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक रॉबर्ट कोएमन यांनी सांगितले.

गेल्या सात सामन्यात विजय मिळवलेले बार्सिलोना आणि आघाडीवरील ॲटलेटिको यांच्यातील फरक आता आठ गुणांचा आहे. रेयाल आणि ॲटलेटिको यांच्यात तीन गुणांचाच फरक आहे; पण झिनेदीन झिदानचा संघ एक लढत जास्त खेळला आहे. पीएसजीविरुद्धच्या 1-4 पराभवानंतर बार्सिलोना ला लिगामध्ये विजय मिळवू शकले नाहीत. 

पीएसजीच्या आशा दुरावल्या

पॅरिस - पीएसजीला घरच्या मैदानावर मोनॅकोविरुद्ध 0-2 हार पत्करावी लागली. त्यामुळे लीग वनमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याच्या आशा दुरावल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच किलिन एम्बापे याने पीएसजीला चॅम्पियन्स लीगमध्ये चमकदार विजय मिळवून दिला होता; पण एम्बापेच्या माजी संघाने पीएसजीला जमिनीवर आणले. मोनॅको यामुळे अकरा सामन्यात अपराजित आहेत. लिलीने लॉरिएंतला 4-1 असे हरवून अग्रक्रमांक मिळवला. 

इंटरचा एसीविरुद्ध विजय

रोम : इंटर मिलानने पारंपरिक प्रतिस्पर्धी एसी मिलानला 3-0 असे हरवून सिरी एमधील आघाडी वाढवली. इंटरने अन्य संघांना किमान चार गुणांनी मागे टाकले आहे. लॉतेरो मार्टीनेझचे दोन गोल हे इंटरच्या विजयाचे वैशिष्ट्य. या विजयामुळे इंटरच्या सिरी ए विजेतेपदाचा दहा वर्षांच्या दुष्काळ संपवण्याच्या आशा उंचावल्या. रोमाला पंधराव्या क्रमांकावरील बेनेवेंतोविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे युव्हेंतिसला तिसरा क्रमांक मिळवण्याची संधी आहे. 

मॅंचेस्टर सिटीची वाढती आघाडी
 

लंडन - मॅंचेस्टर सिटीने आर्सेनेलचा 1-0 असा पराभव केला आणि प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थान भक्कम करताना अन्य संघांना दहा गुणांनी मागे टाकले. मॅंचेस्टर युनायटेडने न्यूकॅसलला 3-1 आणि लिस्टरने ॲस्टॉन व्हिलास 2-1 हरवून दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा वाढवली. दरम्यान, टॉटनहॅमला वेस्ट हॅमविरुद्ध हार पत्करावी लागली. सिटीने सलग 18 वी लढत जिंकली; पण त्यांना खेळ उंचावता आला नाही. मात्र त्यांनी गेल्या तेरापैकी दहा लढतीत गोल स्वीकारलेला नाही.


​ ​

संबंधित बातम्या