गोल करीत रोनाल्डोकडून वाढदिवस साजरा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

इंटरने फ्लोरेंटिनास 2-0 असे हरवले. ते एक सामना कमी खेळले आहेत. इंटरपेक्षा एसी मिलानचा एक गुण कमी आहे; पण एसी क्रोटोनला हरवून अव्वल स्थान मिळवू शकेल.

रोम : कायम बहरात असणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने 36 वा वाढदिवस रोमविरुद्ध गोल करून साजरा केला. त्याच्या सुरेख कामगिरीमुळे युव्हेंटिसने सिरी ए अर्थात इटालियन फुटबॉल साखळीत 2-0 अशी बाजी मारली. या विजयानंतरही युव्हेंटिस आणि आघाडीवरील इंटर मिलान यांच्यात पाच गुणांचा फरक आहे. इंटरने फ्लोरेंटिनास 2-0 असे हरवले. ते एक सामना कमी खेळले आहेत. इंटरपेक्षा एसी मिलानचा एक गुण कमी आहे; पण एसी क्रोटोनला हरवून अव्वल स्थान मिळवू शकेल.

नापोलीस तीन सामन्यांतील दुसरा पराभव स्वीकारावा लागला. ते जेनोआविरुद्ध 1-2 पराजित झाले. रोनाल्डोने तेराव्या मिनिटास लीगमधील त्याचा या मोसमातील सोळावा गोल केला. रोनाल्डोने यामुळे सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत इंटरच्या रोमेलू लुकाकू याला मागे टाकले. रोनाल्डोने इटालियन कप स्पर्धेत इंटरविरुद्ध दोन गोल केले होते. त्यानंतरच्या तीन सामन्यात त्याला एकही गोल करता आला नव्हता. त्याने हा गोलदुष्काळ संपवला; पण त्यानंतर गोलच्या दवडलेल्या दोन संधी त्याला सलत असतील. यापूर्वीच्या लढतीत रोमाने युव्हेंटिसला 2-2 रोखले होते, त्या पार्श्वभूमीवर युव्हेंटिसला हा विजय सुखावत असेल.

युनायटेडने संधी दवडली

लंडन  मॅंचेस्टर युनायटेडने दोनदा आघाडी दवडली. त्यामुळे त्यांना प्रीमियर लीगमधील संयुक्त आघाडीपासून वंचित राहावे लागले. एव्हर्टनने जोरदार प्रतिकार करीत युनायटेडला 3-3 असे रोखले. दरम्यान, ॲस्टॉन व्हिलाविरुद्धच्या 0-1 पराभवामुळे आर्सेनलच्या अव्वल चार संघात स्थान मिळवण्याच्या आशा दुरावल्या आहेत. डॉमनिक कॅल्वर्ट लुईस याने भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटास गोल करीत एव्हर्टनला बरोबरी साधून दिली. साऊदम्प्टनविरुद्ध नऊ गोल केलेल्या युनायटेडने विश्रांतीस 2-0 आघाडी घेतली होती; पण सदोष बचावामुळे त्यांचे प्रीमियर लीग विजेतेपदाचे आठ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे स्वप्न दुरावणार, असेच दिसत आहे. एव्हर्टनने उत्तरार्धात सात मिनिटांत दोन गोल केले. वीस मिनिटे असताना युनायटेडने आघाडी घेतली; पण तरीही विजय दुरावला.  

ISL 2021 : हैदराबादची नॉर्थईस्टशी गोलशून्य बरोबरी

रेयाल माद्रिदचा संघर्षपूर्ण विजय
 

रॅफेल वॅरेन याच्या दोन गोलमुळे रेयाल माद्रिदने ला लिगामध्ये हुएस्काचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर रेयालचे मार्गदर्शक झिनेदीन झिदान यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सुनावले. रेयाल माद्रिद संघात मोठ्या प्रमाणावर बदल करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्यामुळे झिदान संतापले आहेत. त्यांनी आम्ही गतविजेते आहोत, हे विसरू नका, असेही सुनावले. प्रामुख्याने बचावात खेळणाऱ्या वॅरेन याने दोन गोल करून सर्वांना धक्का दिला. दरम्यान, सेविलाने गेताफेला 3-0 असे हरवले आणि बार्सिलोनाला हरवून तिसरा क्रमांक मिळवला. 

डॉर्टमंडचा पुन्हा पराभव

बोरुसिया डॉर्टमंडला जर्मनीतील लीगमध्ये पुन्हा हार पत्करावी लागली. ते फ्रेईबर्गविरुद्ध 1-2 पराजित झाले. त्यांचीही ही 20 लढतीमधील आठवी हार. या पराभवामुळे त्यांची चॅम्पियन्स लीग पात्रता धोक्‍यात आली आहे. दरम्यान, बायर्न लिव्हरकुसेनने स्टुटगार्टला 5-2 असे पराजित केले. 

 


​ ​

संबंधित बातम्या