'आयएसएल`मधील सहा खेळाडू कोरोना बाधित

किशोर पेटकर
Wednesday, 23 September 2020

एखादा खेळाडू कोविड-१९ पोझिटिव्ह असल्यास त्याला स्थानिक सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ दिवस अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. बाधित झाल्यापासून अनुक्रमे दहाव्या, बाराव्या आणि चौदाव्या दिवशी चाचणी घेण्यात येईल. 

पणजी - येत्या नोव्हेंबरमध्ये गोव्यात खेळल्या जाणाऱ्या सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघांचा सराव ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, पण त्यापूर्वीच सहा करारबद्ध फुटबॉलपटू कोराना बाधित ठरले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एटीके-मोहन बागान एफसी, एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी या संघातील प्रत्येकी दोघा खेळाडूंना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी दोघे जण आता कोविड-१९ निगेटिव्ह असून इतर चार जण त्यांच्या घरीच अलगीकरणात आहेत.

आयएसएल स्पर्धा नियमावलीनुसार, एखादा खेळाडू कोविड-१९ पोझिटिव्ह असल्यास त्याला स्थानिक सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ दिवस अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. बाधित झाल्यापासून अनुक्रमे दहाव्या, बाराव्या आणि चौदाव्या दिवशी चाचणी घेण्यात येईल. त्यात संबंधित खेळाडू निगेव्हिट ठरल्यासच तो गोव्यात सरावासाठी संघासमवेत प्रवास करू शकेल. त्यासाठी त्याला आरोग्य प्रशासनाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

हे वाचा - IPL 2020 : जिंकलस रे माही; षटकार थेट रस्त्यावर (Video)

आयएसएल स्पर्धा गोव्यातील तीन स्टेडियमवर खेळली जाईल. स्पर्धेला २१ नोव्हेंबरपासून सुरवात होईल. सर्व संघांच्या सरावासाठी आयोजकांनी गोव्यात १२ मैदाने आरक्षित केली आहेत. स्पर्धा आणि सरावाच्या कालावधीत जैवसुरक्षा वातावरणाची अंमलबजावणी असेल.

आयएसएलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंना आवश्यक खबरदारी बाळगण्यास बजावले आहे. बंगळूर एफसी वगळता बाकी सर्व संघ गोव्यातच स्पर्धापूर्व सराव करणार आहेत. बंगळूर एफसी बळ्ळारी येथील त्यांच्या मैदानावर सराव सत्र घेईल आणि नंतर नोव्हेंबरमध्ये गोव्यात दाखल होण्याची माहिती आहे.

IPL 2020 RR vs CSK: जोफ्रानं झोडपलं; एनगिडीनं दोन चेंडूत दिल्या 27 धावा

प्राप्त माहितीनुसार, बंगळूर एफसी व केरळा ब्लास्टर संघाने आपापल्या भारतीय खेळाडूंची कोविड-१९ चाचणी केली असून सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत. जमशेदपूर एफसी, चेन्नईयीन एफसी, ओडिशा एफसी, मुंबई सिटी व नॉर्थईस्ट युनायटेड या संघांनी अजून खेळाडूंची चाचणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. आयएसएल स्पर्धा आरोग्य आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व संघांना गोव्यात दाखल होण्यापूर्वी सात दिवसांचे विलगीकरण आवश्यक असेल.


​ ​

संबंधित बातम्या