ISL 2021 : गेम चेंजर सांताना; इंज्युरी टाईममध्ये हैदरादनं साधली बरोबरी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 February 2021

स्पर्धेतील 17 लढतीत हैदराबादने नवव्यांदा बरोबरी साधली. त्यांच्या खात्यात आता 24 गुण जमा झाले असून गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पणजी :  हुकमी स्पॅनिश स्ट्रायकर आरिदाने सांताना याने सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये नोंदविलेल्या गोलच्या जोरावर हैदराबाद एफसीचा पराभव टळला. इंडियन सुपर लीग (ISL 2021)  फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या हंगामात हैदराबाद एफसी आणि ईस्ट बंगाल यांच्यातील सामना 1-1 गोलबरोबरीत सुटला. पिछाडीवर असताना सामना बरोबरीत रोखून हैदराबादने गुणतालिकेत तिसरे स्थान कायम राख प्ले-ऑफचा दावा ठेवलाय.

शुक्रवारी वास्कोच्या टिळक मैदानावरील सामना रंगतदार अवस्थेत संपला. ईस्ट बंगालचा 23 वर्षीय नायजेरियन स्ट्रायकर ब्राईट एनोबाखारे याने 59 व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. सामना अतिरिक्त वेळेत गेल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला स्पॅनिश खेळाडू फ्रान सान्डाझा याच्या असिस्टवर आरिदाने सांताना याने गोल डागत हैदराबादला बरोबरी साधून दिली. 82व्या मिनिटास ईस्ट बंगाल संघाला पेनल्टी फटका मिळू शकला नाही. इंज्युरी टाईममधील सातव्या मिनिटास हैदराबादच्या महंमद यासीर याला रेड कार्ड मिळाले.

ISL 2021 : 22 वय.. 21 मिनिटे.. 3 गोल.. 'काश्मिरी' पंडिताची कमाल! 

स्पर्धेतील 17 लढतीत हैदराबादने नवव्यांदा बरोबरी साधली. त्यांच्या खात्यात आता 24 गुण जमा झाले असून गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील  संघाने एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेडपेक्षा आघाडीवर आहे. दुसरीकडे ईस्ट बंगालने 17 लढतीतील आठवी बरोबरी साधली. त्यांच्या खात्यात 17 गुण जमा झाले असून ते नवव्या स्थानावर आहेत.  

ब्राझीलियन आघाडीपटूने ओडिशाचा पराभव टाळला, केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखलं

पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर नायजेरियन ब्राईट एनोबाखारे याने ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. तासाभराच्या खेळास एक मिनिट बाकी असताना ईस्ट बंगालला प्रतिहल्ल्यावर यश मिळाले. मध्यक्षेत्रात अँथनी पिल्किंग्टन याने हेडिंगद्वारे दिलेल्या चेंडूवर ताबा राखत एनोबाखारे याने जबरदस्त कौशल्य आणि वेग साधत मुसंडी मारली. त्याने हैदराबादच्या दोघा बचावपटूंना मागे टाकल्यानंतर जागा सोडून पुढे आलेला गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला चकवत चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली.

ईस्ट बंगालने आघाडी घेतल्यानंतर 73 व्या मिनिटास बदली खेळाडू फ्रान सान्डाझा याचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे हैदराबादला बरोबरी साधणे शक्य झाले नाही. सामन्यातील आठ मिनिटे बाकी असताना हैदराबादच्या पेनल्टी क्षेत्रात एनोबाखारे याने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीच्या अडथळ्याने एनोबाखारे खाली पडला असता रेफरींनी पेनल्टी फटक्याची खूण केली नाही, त्यामुळे कोलकात्यातील संघाची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. 


​ ​

संबंधित बातम्या