ISL 2021 : पेनल्टी शूटआऊटमध्ये गोवा आउट; मुंबई सिटी पहिल्यांदाच फायनलमध्ये

  सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 March 2021

निर्धारित 90 मिनिटांत सामना बरोबरीत राहिल्यानंतर मुंबई सिटी एफसी आणि गोवा एफसी यांच्यातील सामना अतिरिक्त 30 मिनिटात खेळवण्यात आला.

पणजी : उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील अतिशय चुरशीच्या आणि रंगतदार लढतीत मुंबई सिटी एफसीने पेनल्टीशूट आऊटमध्ये सामना जिंकत पहिल्यांदाच फायनल गाठली.  पेनल्टी शूटआऊटवर अचूक फटका मारणारा रॉवलिन बोर्जिस मुंबई सिटी एफसीसाठी हिरो ठरला. तर दिशाहीन नेमबाजी केलेला ग्लेन मार्टिन्स एफसी गोवासाठी व्हिलन ठरला. निर्धारित 90 मिनिटांत सामना बरोबरीत राहिल्यानंतर मुंबई सिटी एफसी आणि गोवा एफसी यांच्यातील सामना अतिरिक्त 30 मिनिटात खेळवण्यात आला. या वेळेतही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. मुंबई सिटीने पेनल्टी फटक्यांवर 6-5 फरकाने बाजी मारत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

सोमवारी बांबोळी यथील जीएमसी स्टेडियमवर रंगतदार सामना पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या स्पर्धेच्या सातव्या हंगामात सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीने प्रथमच अंतिम फेरी गाठली. हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने सहाव्यांदा प्ले-ऑफ फेरी गाठली, पण चौथ्यांदा त्यांना आगेकूच राखण्यात अपयश आले. 2014 मध्ये एटीके संघाने एफसी गोवास प्ले-ऑफमध्ये पेनल्टी शूटआऊटवर 4-2 असे हरविले होते. गतमोसमातील प्ले-ऑफ फेरीत एफसी गोवास चेन्नईयीनने नमविले होते.

संजना...आय लव्ह यू! बुमराहची नवरी बनून नटणारी सुंदरी कोण?

120 मिनिटांच्या खेळातील गोलशून्य बरोबरीनंतर निकालासाठी पेनल्टीचा वापर झाला. पेनल्टीसाठी दोन्ही संघाने गोलरक्षक बदलले. एफसी गोवाने धीरज सिंगऐवजी नवीन कुमारला, तर 120 मिनिटे भक्कम ठरलेल्या अमरिंदर सिंगच्या जागी मुंबई सिटीने फुर्बा लाचेन्पा याला नेटसमोर आणले.  पेनल्टी शूटआऊटवर एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदियाचा पहिला फटका लाचेन्पा याने रोखला. नंतर मुंबई सिटीच्या बार्थोलोमेव ओगबेचेने गोल केला. एफसी गोवाच्या ब्रेंडन फर्नांडिसचा फटका गोलपोस्टला आपटला, तर मुंबई सिटीच्या हर्नान सांतानाचा फटका एफसी गोवाचा गोलरक्षक नवीन कुमार याने अडविला. इगोर आंगुलोने एफसी गोवास बरोबरी साधून दिली. मुंबई सिटीच्या ह्युगो बुमूस याचा फटका नवीन कुमारने अडविल्यामुळे बरोबरी कायम राहिली. इव्हान गोन्झालेझने अचूक फटका मारल्यामुळे एफसी गोवास आघाडी मिळाली. मुंबई सिटीच्या रेनियर फर्नांडिसने अचूक फटका मारला.

जेम्स डोनाकी याने फटका गोलपट्टीवरून मारल्याने एफसी गोवाचे नुकसान झाले. अहमद जाहूचा पेनल्टी फटका नवीन कुमारने अडविल्यामुळे पेनल्टी फटक्यावरील बरोबरी कायम राहिली. त्यानंतर ईशान पंडिताने अचूक फटका मारला. नंतर मुंबई सिटीच्या अमेय रानावडे याने 3-3 बरोबरी केली. एफसी गोवाच्या होर्गे ओर्तिझचा फटका अचूक ठरला. मुंबई सिटीच्या मुर्तदा फॉलने 4-4 अशी बरोबरी केली. आदिल खानने एफसी गोवास 5-4 आघाडीवर नेल्यानंतर मुंबई सिटीच्या मंदार राव देसाईने 5-5 बरोबरी केली. एफसी गोवाच्या ग्लेन मार्टिन्स याने फटका बाहेर मारल्यानंतर रॉवलिन बोर्जिसने मुंबई सिटीस 6-5 फरकाने अंतिम फेरीत नेले.

फेडररला मागे टाकत जोकोविचनं रचला नवा विश्वविक्रम

गोलशून्य पूर्वार्धानंतर एफसी गोवाने उत्तरार्धात आक्रमकतेवर भर दिला, मात्र मुंबई सिटीचा गोलरक्षक कर्णधार अमरिंदर सिंग याच्या दक्षतेमुळे एफसी गोवास आघाडी मिळू शकली नाही. त्यामुळे निर्धारित 90 मिनिटांतील गोलशून्य बरोबरीमुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. 103व्या मिनिटास एफसी गोवाच्या एदू बेदियाची फ्रीकिक अमरिंदर अचूक अंदाज बांधत फोल ठरविल्यानंतर 114व्या मिनिटास ईशान पंडिताने मुंबई सिटीच्या बचावफळीतील गोंधळाचा लाभ उठवत चेंडूवर ताबा राखला होता, पण चेंडूस योग्य दिशा दाखवू शकला नाही.

एफसी गोवाचे नव्वद मिनिटांत वर्चस्व
 

48व्या मिनिटास अलेक्झांडर जेसूराज याच्या डाव्या पायाचा सणसणीत फटका अमरिंदरने वेळीच दिशाहीन केला. त्यानंतर 54व्या मिनिटास होर्गे ओर्तिझ याचा फ्रीकिक फटका योग्य दिशा राखू शकला नाही. त्यानंतर लगेच पुढच्या मिनिटास इव्हान गोन्झालेझच्या थ्रॉ-ईनवर सेवियर गामा याने आक्रमक फटका अमरिंदरने वेळीच रोखून मुंबई सिटीवर संकट टाळले. बदली खेळाडू ईशान पंडिता याला सुरेख संधी प्राप्त झाली होती. अलेक्झांडर जेसूराजच्या क्रॉस पासवर पंडिताचे हेडिंग अमरिंदरने योग्य अंदाज बांधत अडविले. इंज्युरी टाईमच्या चौथ्या मिनिटास एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदिया याच्या दूरवरील भेदक पासवर जेम्स डोनाकी हेडिंग साधू शकला नाही आणि सामना जादा वेळेत गेला. सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासातील खेळानंतर अमरिंदर सिंगने झेपावत ओर्तिझचा फ्रीकिक फटका रोखला होता. पहिल्या 45 मिनिटांतील खेळात एफसी गोवाने मुंबई सिटीवर वरचष्मा राखला. त्यामुळे गोलरक्षक अमरिंदरला सतत दक्ष राहावे लागले.

पंडिताला जास्त मिनिटे 

मोसमात प्रथमच एफसी गोवाच्या ईशान पंडिता याला सोमवारी जास्त मिनिटे खेळण्याची संधी लाभली. रेडीम ट्लांग याच्या जागी तो 46व्या मिनिटास मैदानात उतरला. स्पर्धेत 14 गोल केलेला एफसी गोवाचा स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याला आज बेंचवर राहावे लागले. निलंबन संपवून इव्हान गोन्झालेझ व आल्बर्टो नोगेरा यांनी पुनरागमन केले. भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या