ISL 2021 : केरळा ब्लास्टर्स ठरला कमनशिबी; जमशेदपूरला गोलशून्य बरोबरीचा आनंद

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

सामन्याच्या सातव्या मिनिटास जमशेदपूरने जवळपास आघाडी घेतली होती, मात्र सुरवातीची चूक सुधारत केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने नेरियूस व्हाल्सकिस याचा प्रयत्न उधळला.

पणजी : केरळा ब्लास्टर्स संघ बुधवारी कमनशिबी ठरला. त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखत वारंवार आक्रमणे रचली, पण गोलपोस्टचा अडथळा आल्यामुळे त्यांना गोल नोंदविण्यात अपयश आले.  सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात जमशेदपूर एफसी संघ सामना गोलशून्य बरोबरीत राखण्यात नशिबवान ठरला.

पूर्वार्धातील ऑफसाईड गोल, तसेच फटक्याने वेळोवेळी गोलपोस्टचा वेध घेतल्यामुळे वरचष्मा राखलेल्या केरळा ब्लास्टर्सला फक्त एकच गुण मिळाला. त्यांची, तसेच जमशेदपूरची ही प्रत्येकी 14 लढतीतील सहावी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे समान 15 गुण झाले. 4 गोलसरासरीमुळे जमशेदपूरला सातवा, तर 5 गोलसरासरीमुळे केरळा ब्लास्टर्सला आठवा क्रमांक मिळाला आहे. केरळचा संघ आता पाच सामने अपराजित आहे.

सामन्याच्या पूर्वार्धात केरळा ब्लास्टर्स संघ कमनशिबीच ठरला. त्यांनी धारदार आक्रमणे रचत जमशेदपूरच्या बचावफळीवर, तसेच गोलरक्षक टीपी रेहेनेशवर सतत दबाव टाकला, पण गोलपोस्टचा अडथळा आल्यामुळे त्यांना संधीचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. सामन्याच्या 35व्या गॅरी हूपर याने गोल केला होता, पण लाईन्समनने ऑफसाईडची खूण केल्यामुळे केरळा ब्लास्टर्सचा जल्लोष अर्धवटच राहिला. विश्रांतीला चार मिनिटे बाकी असताना हूपरच्या सणसणीत फटक्यासमोर गोलरक्षक रेहेनेश पूर्णपणे चकला होता, पण गोलपट्टीला चेंडू लागला. रिप्लेत चेंडू गोलरेषेच्या आत पडल्याचे स्पष्ट झाले, मात्र त्यावेळी कोणाच्याही लक्षात आले नाही. दोन मिनिटानंतर केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्डन मरे याचे हेडिंग गोलपट्टीमुळे यशस्वी ठरू शकला नाही.  

ICC Women’s ODI Rankings : टॉप 10 मध्ये ऑस्ट्रेलिच्या 'चार-चौघी'सह स्मृती-मितालीचाही समावेश

सामन्याच्या शेवटच्या मिनिटास पुन्हा एकदा केरळा ब्लास्टर्सला गोलपट्टीने अडथळा आणला. जॉर्डन मरे याचे हेडिंग गोलरक्षक रेहेनेशने झेपावत अडविले, लगेच रिबाऊंडवर लाल्थाथांगा खॉल्हरिंग याने फटका मारला, यावेळेस चेंडूने पुन्हा गोलपट्टीचा वेध घेतल्याने गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

सामन्याच्या सातव्या मिनिटास जमशेदपूरने जवळपास आघाडी घेतली होती, मात्र सुरवातीची चूक सुधारत केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने नेरियूस व्हाल्सकिस याचा प्रयत्न उधळला. जागा सोडण्याची चूक केलेल्या आल्बिनोने वेळीच मागे धाव घेत चेंडू बोटांच्या साह्याने अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू गोलपोस्टला आपटून दिशाहीन झाला.


​ ​

संबंधित बातम्या