ISL 2021 : FC हैदराबादचं स्वप्न भंग करत FC गोवानं मिळवलं प्ले ऑफचं तिकीट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

स्पर्धेतील दहाव्या बरोबरीनंतर एफसी गोवा संघाने 20 लढतीनंतर 31 गुण कमावले आहेत. गुणतालिकेत संघ चौथा क्रमांकावर आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हैदराबादला विजयासह 3 गुणांची आवश्यकता होती.

पणजी : एफसी गोवा संघाचा बचावपटू इव्हान गोन्झालेझ याने इंज्युरी टाईममध्ये हैदराबादच्या लिस्टन कुलासो याचा फटका ऐनवेळी रोखल्यामुळे गोवा संघाचा पराभव टळला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे एका गुणाच्या मदतीने गोवा एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या हंगामातील प्ले-ऑफ फेरीत जागा मिळवली. निर्धारित 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडू गोल करण्यासाठी संघर्ष करताना दिसले. सामना बरोबरीत राखत एफसी गोवाने स्पर्धेच्या सात मोसमाच्या इतिहासात सहाव्यांदा प्ले-ऑफ फेरी गाठली. त्यांना दोन टप्प्यातील उपांत्य फेरीसाठी बरोबरीच्या एका गुणाची आवश्यकता होती, जे त्यांनी साध्य केले. 

ICC Test Rankings : रोहितची सर्वोत्तम रँकिंगला गवसणी; अश्विनलाही झाला फायदा

स्पर्धेतील दहाव्या बरोबरीनंतर एफसी गोवा संघाने 20 लढतीनंतर 31 गुण कमावले आहेत. गुणतालिकेत संघ चौथा क्रमांकावर आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हैदराबादला विजयासह 3 गुणांची आवश्यकता होती. सामन्यातील बरोबरीमुळे त्यांचे स्वप्न भंगले आहे.  अकराव्या बरोबरीसह 20 लढतीनंतर 29 गुणांसह त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

सामन्यातील अखेरच्या मिनिटांमध्ये बदली खेळाडू म्हणून आलेल्या दोन्ही संघांच्या प्रत्येकी एका खेळाडूस रेड कार्ड मिळाले. हैदराबादच्या लुईस सास्त्रे व एफसी गोवाच्या आल्बर्टो नोग्युएरा यांच्यावर रेफरीने अखिलाडूवृत्तीबद्दल कारवाई केली. एफसी गोवाच्या बचावफळीत भक्कम ठरलेला आदिल खान सामन्याचा मानकरी ठरला. एफसी गोवा संघ सेटपिसेसवर कमजोर आहे याची जाणीव असल्याने मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादने उत्तरार्धात प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्यास सुरवात केली, पण त्यांना यश मिळाले नाही. हैदराबादला कर्णधार आरिदाने सांताना याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. स्पर्धेत 10 गोल व दोन असिस्ट नोंदविलेला हा हुकमी स्पॅनिश खेळाडू स्पर्धेतील चौथ्या यलो कार्डमुळे लढतीसाठी निलंबित ठरला.

एफसी गोवा संघ बचावला

सामन्यातील पाच मिनिटे बाकी असताना हैदराबादला आघाडीची संधी होती, परंतु लिस्टन कुलासोच्या असिस्टवर हालिचरण नरझारी अचूक फटका मारू शकला नाही. सामन्याच्या इंज्युरी टाईममधील तिसऱ्या मिनिटास हैदराबादने जवळपास आघाडी घेतली होती, पण बचावपटू इव्हान गोन्झालेझ याच्या दक्षतेमुळे एफसी गोवा पिछाडीवर जाण्यापासून बचावला. यावेळी स्पॅनिश खेळाडूने लिस्टन कुलासोचा फटका गोललाईनवरून परतावला. लगेच एफसी गोवा संघ स्वयंगोलपासून बचावला. आदिल खान याच्या हेडरवर गोलरक्षक धीरज सिंग याने पूर्ण एकाग्रतेने उंचावत नेटमध्ये घुसू पाहणाऱ्या चेंडूची दिशा बदलली.
 


​ ​

संबंधित बातम्या