ISL2021 : `लकी सुपर सब`चा हिरो; शेवटच्या क्षणी पुन्हा ईशानचा जलवा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 13 February 2021

90+2व्या मिनिटास आल्बर्टो नोगेरोच्या शानदार असिस्टवर ईशानने गोल नोंदवत एफसी गोवास बरोबरी साधून दिली. बदली खेळाडू म्हणून त्याचा हा चौथा गोल ठरला. 

पणजी : एफसी गोवासाठी ईशान पंडिता पुन्हा एकदा लकी सुपर सब ठरला. इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटास त्याने नोंदविलेल्या गोलमुळे एफसी गोवा संघाला पराभव टाळण्यास यश मिळाले. या सामन्यातील बरोबरीच्या जोरावर गोवा एफसी संघाने प्ले-ऑफ फेरीतील आशा पल्लवित ठेवल्या आहेत. सातव्या हंगामातील इंडियन सुपर लीग (ISL2021)  फुटबॉल स्पर्धेत गोवा संघाने चेन्नईयीन एफसीला 2-2 गोलबरोबरीत रोखले. या निकालानंतर गोवा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. 

गोव्याचा संघ स्पर्धेतील सलग 10 सामन्यात अपराजित राहिला असून संघाने सलग सहावा सामना बरोबरीत सोडवला. शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना रंगला होता. 90+2व्या मिनिटास आल्बर्टो नोगेरोच्या शानदार असिस्टवर ईशानने गोल नोंदवत एफसी गोवास बरोबरी साधून दिली. बदली खेळाडू म्हणून त्याचा हा चौथा गोल ठरला. 

ISL 2021 : 22 वय.. 21 मिनिटे.. 3 गोल.. 'काश्मिरी' पंडिताची कमाल!

सामन्याच्या 66 व्या मिनिटास अलेक्झांडर जेसूराज याच्या जागी प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी 22 वर्षीय ईशानला मैदानात पाठवले होते.  एफसी गोवाच्या बचावफळीतील चुकांचा लाभ उठवत चेन्नईयीनसाठी स्लोव्हाकियाच्या याकुब सिल्व्हेस्टर याने 13 व्या तर लाल्लियानझुआला छांगटे याने 60 व्या मिनिटाला गोल डागला होता.  चेन्नईयीनचा कर्णधार एली साबिया याच्या हँडबॉलनंतर मिळालेल्या पेनल्टीवर 37 वर्षीय स्पॅनिश इगोर आंगुलो याने एफसी गोवाची 19व्या मिनिटास पिछाडी कमी केली. आंगुलोचा हा 12 वा गोल ठरला.

एफसी गोवाची ही 17 लढतीतील नववी बरोबरी ठरली. त्यांचे आणि हैदराबादचे समान 24 गुण झाले आहेत. एफसी गोवाने (+5) सरस गोलसरासरीवर हैदराबादला (+4) चौथ्या स्थानी ढकलले आहे. 57वा वाढदिवस असलेल्या साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीचे आव्हान आटोपल्यात जमा आहे. त्यांचे 18 सामन्यानंतर 18 गुण झाले असून आठवा क्रमांक कायम आहे.


​ ​

संबंधित बातम्या