ISL 2021 : 85 मिनिटे दहा खेळाडूंनी लढवली खिंड; पण...

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीत लीग विनर्स शिल्ड आणि एएफसी चँपियन्स लीग पात्रतेसाठी एटीके मोहन बागानला मुंबई सिटीविरुद्ध बरोबरी पुरेशी असेल.

पणजी :  हैदराबाद एफसीने सामन्यातील 85 मिनिटे दहा खेळाडूंसह खिंड लढविली, पण इंज्युरी टाईम खेळातील तिसऱ्या मिनिटास गोल स्वीकारल्यामुळे त्यांना झुंजार विजय हुकला. एटीके मोहन बागानने दोन वेळा पिछाडीवरून येत सामना 2-2 गोलबरोबरीत राखला. या विजयाच्या जोरावर त्यांना लीन विनर्स शिल्डसमीप जाणे शक्य झाले. वास्को येथील टिळक मैदानावर रंगलेल्या सामन्यात  प्रीतम कोटल याने सेटपिसेसवर 90+3व्या मिनिटास एटीके मोहन बागानला बरोबरी साधून दिली.

यावेळी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याचा गलथानपणा हैदराबादला महागात पडला. पाचव्याच मिनिटास चिंगलेनसाना सिंग याला थेट रेड कार्ड मिळाले, तरीही त्यांनी आठव्या मिनिटास आरिदाने सांतानाच्या गोलमुळे आघाडी घेत पूर्वार्धात एटीके मोहन बागानला यश मिळू दिले नाही. 57 व्या मिनिटास मनवीर सिंगने कोलकात्याच्या संघाला बरोबरी साधून दिली. बदली खेळाडू नेदरलँड्सचा रोलँड अलबर्ग याने 75व्या मिनिटास हैदराबादला पुन्हा आघाडी मिळवून दिली होती.

आजच्या निकालामुळे आता स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा दिवस निर्णायक असेल. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीत लीग विनर्स शिल्ड आणि एएफसी चँपियन्स लीग पात्रतेसाठी एटीके मोहन बागानला मुंबई सिटीविरुद्ध बरोबरी पुरेशी असेल. सध्या एटीके मोहन बागानचे 19 लढतीनंतर सर्वाधिक 40 गुण मिळवले. मुंबई सिटीवर सहा गुणांची आघाडी मिळविली आहे. सलग पाच सामने जिंकल्यानंतर एटीके मोहन बागानने आज स्पर्धेतील एकंदरीत चौथी बरोबरी नोंदविली. 

IND vs ENG : पिंक बॉलवर खेळण्यासाठी उमेश यादव फिट; BCCI ने शार्दुलला केलं रिलीज

हैदराबादची ही दहावी बरोबरी ठरली. सलग 11 सामने अपराजित असलेल्या संघाचे आता 19 लढतीनंतर 28 गुण झाले असून तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवापेक्षा दोन गुण कमी आहेत. ते चौथ्या क्रमांकावर आहेत. एफसी गोवा आणि हैदराबाद यांच्यातही 28 रोजी लढत होईल. त्या लढतीनंतर प्ले-ऑफ फेरीतील संघ निश्चित होतील.

सामन्याच्या पूर्वार्धात मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसीने झुंजार खेळ केला. एटीके मोहन बागानच्या डेव्हिड विल्यम्स याला मागून ओढणे चिंगलेनसाना याला खूपच महागात पडले, यावेळी विल्यम्स गोल करण्याच्या प्रयत्नात होता. रेफरीने थेट रेड कार्ड दाखविल्यामुळे हैदराबादला एका खेळाडूस मुकावे लागले.

राशीद खानच्या हेलीकॉप्टर शॉटवर इंग्लिश महिला क्रिकेटर झाली फिदा (VIDEO)

हैदराबादचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर आल्याची संधी एटीके मोहन बागानला साधता आली नाही. तीन मिनिटानंतर बचावपटू प्रीतम कोटल याच्या चुकीमुळे कोलकात्याच्या संघाला पिछाडीवर जावे लागले. प्रीतमचा बॅकपास चुकीचा ठरला. गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जकडे चेंडू जाण्यापूर्वीच आरिदाने सांतानाने झडप घालत आघाडीचा गोल नोंदविला. गोलरक्षक चेंडूपर्यंत पोहचेपर्यंत उशीर झाला होता.

विश्रांतीनंतरच्या बाराव्या मिनिटास गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीच्या कमजोर बचावामुळे हैदराबादला आघाडी गमवावी लागली. डेव्हिड विल्यम्सच्या असिस्टवर मनवीरने चेंडूला योग्य दिशा दाखविताना हैदराबादच्या बचावातील त्रुटींचा लाभ उठविला. उत्तरार्धातील कुलिंग ब्रेकपूर्वी सेटपिसेसवर हैदराबादने पुन्हा आघाडी मिळविली. तीन मिनिटांपूर्वी लिस्टन कुलासोच्या जागी मैदानात उतरलेल्या अलबर्ग याने गोल नोंदवत हैदराबादची बाजू वरचढ केली.


​ ​

संबंधित बातम्या