भारतीय फुटबॉल संघ पुढील महिन्यात नेपाळविरुद्ध दोन सामने खेळणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 August 2021

भारताचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आणि आयएफए इलेव्हन यांच्यातील प्रदर्शनीय सामन्याबाबत भारतीय फुटबॉलचे मार्गदर्शक इगोल स्टिमॅक यांनी समाधान व्यक्त केले. असे सराव सामने नियमित व्हायला पाहिजेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कोलकाता - भारताचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आणि आयएफए इलेव्हन यांच्यातील प्रदर्शनीय सामन्याबाबत भारतीय फुटबॉलचे मार्गदर्शक इगोल स्टिमॅक यांनी समाधान व्यक्त केले. असे सराव सामने नियमित व्हायला पाहिजेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. या सामन्याद्वारे भारताने नेपाळविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या मैत्रीपूर्ण् सामन्यांची तयारी सुरू केली.

एएफसी चषकात भाग घेणारे काही भारतीय खेळाडू सध्या मालदिवमध्ये आहेत. त्यांच्या क्लबचे सामने संपल्यानंतर हे खेळाडू राष्ट्रीय शिबिरात दाखल होतील. आजच्या प्रदर्शनीय सामन्यात भारतीय संघाच्या आकाश मिश्राने उत्तरार्धात निर्णायक गोल केला.

अशा प्रकारचा सराव सामना आयोजित केला याबाबत मी फुटबॉल संघटेचा आभारी आहे. असे सामने नियमितपणे व्हायला हरकत नाही. तसेच कोलकाता हे फुटबॉलसाठी उत्तम ठिकाण आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारे सराव करण्याची संधी मिळणे फार महत्त्वाचे आहे, असे स्टिमॅक यांनी सांगितले.

कोलकात्यात राष्ट्रीय शिबिराचे आयोजन १५ वर्षांत प्रथमच झाले आहे. याअगोदर २००६ मध्ये सौदी अरेबियाविरुद्ध विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर येथे झाले होते. हा सराव सामना असल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना दुखापत होणार नाही यासाठी मी सावध होतो, बऱ्याच काळानंतर खेळाडू मैदानावर उतरले असल्यामुळे त्यांच्याकडून अधिक परिश्रम करून घेतले नाहीत, असेही स्टिमॅक म्हणाले.

नेपाळविरुद्ध होणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्व सामन्यांसाठी भारतीय संघ या महिन्याच्या शेवटी काठमांडूला जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सामने आयोजित करणे खूप कठीण आहे. तसेच सध्या कोणताही संघ भारतात येऊ शकत नाही आणि आम्हाला खेळायला बाहेर जायचे असेल तर विलगीकरणाचेही आव्हान पेलावे लागत आहे, त्यामुळे पर्याय खूप मर्यादित आहेत, अशी खंतही स्टिमॅक यांनी व्यक्त केली.


​ ​

संबंधित बातम्या