बेनझेमाचे पुनरागमन, फ्रान्सची सरशी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 June 2021

सहा वर्षांनंतर फ्रान्स संघात पुनरागमन करणाऱ्या करीम बेनझेमाने पेनल्टी किक दवडली, पण फ्रान्सने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वेल्सचा पराभव केल्यामुळे तो खूष होता. जगज्जेत्या फ्रान्सने युरो सराव सामन्यात ३-० बाजी मारली. फ्रान्सने अंतिम संघात बेनझेमाला संधी दिली.

पॅरिस - सहा वर्षांनंतर फ्रान्स संघात पुनरागमन करणाऱ्या करीम बेनझेमाने पेनल्टी किक दवडली, पण फ्रान्सने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वेल्सचा पराभव केल्यामुळे तो खूष होता. जगज्जेत्या फ्रान्सने युरो सराव सामन्यात ३-० बाजी मारली. फ्रान्सने अंतिम संघात बेनझेमाला संधी दिली. २०१५ मध्ये ब्लॅकमेलचा कट रचल्यामुळे त्याच्यावर बंदी आली होती. किलिन एम्बापे, अँतॉईन ग्रिएझमन, ऑस्मन देम्बेले यांनी प्रत्येकी एक गोल करीत फ्रान्सला गतस्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेल्या वेल्सविरुद्ध विजयी केले. फ्रान्स मार्गदर्शकांनी संघात काही प्रयोग करताना गोलरक्षक ह्युगो लॉरिसला शंभराव्या सामन्यात कर्णधार केले; तर एनगोलो कांते याला ब्रेक दिला. वेल्सचे बदली मार्गदर्शक अॅरॉन रॅमसे याला संघाबाहेर ठेवले. बेनझेमाने वेल्सची चार चौथ्या मिनिटास निष्प्रभ ठरवली. त्याने २२ व्या मिनिटास पेनल्टी मिळवली, पण तो गोलरक्षकास चकवू शकला नाही.

इंग्लंडला फटका
इंग्लंडने ऑस्ट्रियाचा १-० असा पराभव केला, पण त्यांचा बचावपटू ट्रेंट अलेक्झांडर अरनॉल्ड याला दुखापत झाली. त्यामुळे तो स्पर्धेस मुकण्याची शक्यता आहे. तो इंग्लंडचा प्रमुख राईट बॅक आहे. दरम्यान, इंग्लंडला चेल्सी, मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूंविना खेळावे लागले. त्यामुळे इंग्लंड संघात प्रामुख्याने नवोदितांना स्थान होते.

जर्मनी - डेन्मार्क बरोबरी
मॅटस् हमेल्स आणि थॉमस म्युएल्लर यांनी दोन वर्षांनंतर जर्मनी संघात पुनरागमन केले. जर्मनीला डेन्मार्कविरुद्ध १-१ बरोबरी स्वीकारावी लागली. गेल्या ११ सामन्यात १८ गोल स्वीकारल्यामुळे जर्मनीने बचाव भक्कम करण्यासाठी हमेल्सची निवड केली आहे, पण तो डेन्मार्कला गोलपासून रोखू शकला नाही. हा अपवाद सोडल्यास जर्मनीच्या बचावात नक्कीच सुधारणा दिसली. म्यूएल्लरने प्रभावी चाली करत उपयुक्तता दाखवली. 
दरम्यान, एक मिनीट असताना गोल केल्यामुळे नेदरलँडसने स्कॉटलंडविरुद्धची लढत २-२ बरोबरीत सोडवली.

नेदरलँडस् संघातही एक बाधित
स्कॉटलंडपाठोपाठ नेदरलँडस् संघातील एका खेळाडूस कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळले आहे. मध्यरक्षक जॉन फ्लेक बाधित झाल्यामुळे स्कॉटलंडने सात खेळाडूंना ब्रेक दिला; तर नेदरलँडसचा प्रमुख गोलरक्षक जॅस्पर सिलेसन हाही बाधित झाला आहे. त्याला संघातून वगळण्याचा निर्णय नेदरलँडस् संघाने घेतला. फ्लेक बाधित आढळल्यावरच्या चाचणीत स्कॉटलंडचे खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या