अँटोनी ग्रीजमॅनच्या कामगिरीमुळे फ्रान्सचा क्रोएशियावर विजय 

टीम ई-सकाळ
Wednesday, 9 September 2020

फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यादरम्यान झालेल्या या सामन्याने फुटबॉल चाहत्यांना पुन्हा विश्वचषक फायनलची आठवण करून दिली.

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सने क्रोएशियाला 4 - 2 ने पराभूत केले आहे. फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यादरम्यान झालेल्या या सामन्याने फुटबॉल चाहत्यांना पुन्हा विश्वचषक फायनलची आठवण करून दिली. फ्रान्सच्या अँटोनी ग्रीजमॅनने 43 व्या मिनिटाला पहिला गोल केला. व तसेच 65 व्या मिनिटाला ड्योट उपामेकॅनोला क्रोएशिया विरुद्ध तिसरा गोल करण्यास मदत केली. 

आता फ्रान्सच्या फुटबॉल संघातील 'या' खेळाडूला कोरोनाचा संसर्ग  

फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात झालेल्या सामन्यात, क्रोएशियाच्या लोवॉरेनने खेळाच्या पहिल्या सत्रातच 16 व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अँटोनी ग्रीजमॅनने 43 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवत फ्रान्सला क्रोएशियाविरुद्ध बरोबरी करून दिली. यानंतर लगेच दोन मिनिटांनी डॉमिनिक लिवाकोविचच्या आत्मघाती गोलमुळे फ्रान्सने क्रोएशियावर 2 - 1 ने बढत मिळवली. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रात क्रोएशियाच्या जोसेफ ब्रेकलोने 55 व्या मिनिटाला गोल करून सामना पुन्हा बरोबरीत आणला होता. पण त्यानंतर  65 व्या मिनिटाला ड्योट उपामेकॅनोने आणि 77 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर ऑलिव्हर गिराउडने गोल केल्यामुळे फ्रान्सने हा सामना आपल्या बाजूला झुकवला. यानंतर दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध एकही गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे फ्रान्सने या सामन्यात 4 - 2 ने क्रोएशियावर विजय मिळवला आहे. 

सेरेना विल्यम्स, डॉमिनिक थिम व मेदवेदेव यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

दरम्यान, फ्रान्स आणि पॅरिस सेंट जर्मेन (पीएस) संघाचा फुटबॉलपटू स्ट्रायकर कॅलियन एमबापेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तर यापूर्वी फ्रान्स संघातीलच व मॅनचेस्टर युनायटेड मधील मिडफिल्डर पॉल पोग्बाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते. क्रोएशियावर मिळवलेल्या या विजयामुळे फ्रान्सने तिसऱ्या गटात पोर्तुगालशी बरोबरी साधली आहे. परंतु गोलच्या तुलनेत फ्रान्स पोर्तुगाल पेक्षा मागे आहे.             


​ ​

संबंधित बातम्या