बाधितांच्या संपर्कातील फुटबॉलपटू चाचणीत उत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 July 2021

दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघातील तिघे सदस्य बाधित. त्यांच्या सानिध्यात १८ खेळाडू आणि त्यांची जपानविरुद्ध लढत. या घडामोडींनी जपान-आफ्रिका फुटबॉल लढतीचे औत्सुक्य वाढले होते. या सामन्यात जपानने १-० बाजी मारली, पण आपल्या कोणत्याही खेळाडूस काहीही झालेले नाही याचे समाधान दक्षिण आफ्रिका संघास होते.

टोकियो - दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघातील तिघे सदस्य बाधित. त्यांच्या सानिध्यात १८ खेळाडू आणि त्यांची जपानविरुद्ध लढत. या घडामोडींनी जपान-आफ्रिका फुटबॉल लढतीचे औत्सुक्य वाढले होते. या सामन्यात जपानने १-० बाजी मारली, पण आपल्या कोणत्याही खेळाडूस काहीही झालेले नाही याचे समाधान दक्षिण आफ्रिका संघास होते.

दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला, त्यावेळी संघ व्यवस्थापनास युरो स्पर्धेतील डेन्मार्क संघातील ख्रिस्तियन एरिक्सनचे मैदानावर कोसळणे आठवत होते. संघ आफ्रिकेतून निघाला त्यावेळी तिथे थंडी होती, तर सध्या जपानमध्ये कडक उन्हाळा आहे. त्यातच संघास विलगीकरणात राहावे लागल्याने सरावही नव्हता. आम्हाला निकालापेक्षा खेळाडूंच्या आरोग्याची चिंता जास्त होती. युरो स्पर्धेतील डेन्मार्कच्या खेळाडूचा प्रसंग आमच्या डोळ्यासमोर येत होता, असे दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार मॅलेप याने सांगितले. 

जपानला ही लढत खेळताना वेगळीच चिंता वाटत होती. जपानमधील कोरोना प्रतिबंधक नियमानुसार कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना १४ दिवस विलगीकरणात रहावे लागते. हाच नियम जपानमधील व्यावसायिक लीगमध्येही आहे. मात्र ऑलिंपिक स्पर्धेत लढतीपूर्वी सहा तास केलेल्या चाचणीत निगेटिव्ह आढळल्यास खेळण्याची परवानगी देण्यात येते. 

दक्षिण आफ्रिका संघातील बाधितांच्या संपर्कात असलेल्यांना क्रीडानगरीत कॅफेटरीयातही प्रवेश नाही. त्यांना केवळ सरावासाठीच एकत्र येण्याची मुभा होती. अन्य वेळ स्वतंत्र रूममध्ये राहण्याची सूचना होती. या परिस्थितीत संघाच्या तंदुरुस्तीचा प्रश्न होता. अर्थात सामन्यापूर्वी सहा तास झालेल्या चाचणीनंतर १७ खेळाडू खेळण्यासाठी पात्र ठरले होते. जागतिक महासंघाने मैदानावर १८ खेळाडूंना परवानगी दिली आहे.


​ ​

संबंधित बातम्या