फ्रान्समधील लीग स्पर्धेत हाणामारी, सामना स्थगित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 August 2021

फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी पीएसजी संघात आल्यामुळे सर्वाधिक चर्चेत आलेली फ्रान्समधील लीग स्पर्धा रविवारी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारण्यासाठी प्रेक्षक मैदानात आले.

पॅरिस - फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी पीएसजी संघात आल्यामुळे सर्वाधिक चर्चेत आलेली फ्रान्समधील लीग स्पर्धा रविवारी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारण्यासाठी प्रेक्षक मैदानात आले. दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे सामना मध्येच स्थगित करण्याची नामुष्की आली.

यजमान संघ नाईस आणि मार्सेली यांच्यात सामना सुरू होता, परंतु प्रेक्षकांनी मैदानावर हैदोस घातल्यामुळे मार्सेली संघाने सामना पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला. आमच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेची अजिबात खात्री नव्हती म्हणून आम्ही सामना खेळण्यास नकार दिला असे मार्सेली क्लबचे अध्यक्ष पाब्लो लाँगोरिया यांनी सांगितले.

सामना सुरू असताना प्रेक्षकांमधून मार्सेली संघातील खेळाडूंवर बाटल्या आणि काही वस्तू फेकण्यात आल्या. यात तीन खेळाडू जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाईस संघ १-० अशा आघाडीवर हा सामना स्थगित झाला होता, घरच्या मैदानावर सामना होत असल्याने नाईस संघाचे खेळाडू सामना सुरू करण्याच्या मनस्थितीत होते, परंतु मार्सेली संघाचा एकही खेळाडू खेळण्यास तयार नव्हता. एखाद्या संघाने खेळण्यास नकार दिला, तर नियमानुसार प्रतिस्पर्धी संघ हा सामना ३-० अशा फरकाने जिंकल्याचे जाहीर करण्यात येते.

काय घडले सामन्यात?
सामना संपण्यास १५ मिनिटांचा कालावधी शिल्लक होता. मार्सेलीचा मिडफिल्डर दिमित्री पायेतला पाठीमागून नाईस संघाच्या पाठीराख्यांनी बाटली फेकून मारली. चिडलेल्या पायेतने हीच बाटली उचलली आणि ज्या दिशेने बाटली आली होती, त्याच दिशेने भिरकावली. काही वेळात हेच प्रेक्षक पायेतला मारण्यासाठी मैदानात धावत आले आणि दंगलसदृश परिस्तिथी निर्माण झाली. भर मैदानात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर सुरक्षारक्षकांनी प्रेक्षकांना बाजूला ढकलत परिस्थिती नियंत्रणात आणली.


​ ​

संबंधित बातम्या