पोलंडविरुद्धच्या बरोबरीमुळे स्पेनला साखळीत बाद होण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 June 2021

सदोष नेमबाजीचा फटका स्पेनला पुन्हा बसला. पेनल्टी किकही दवडलेल्या स्पेनला युरो फुटबॉल स्पर्धेतील पोलंडविरुद्धच्या लढतीत १-१ बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे ते साखळीत बाद होण्याचा धोका आहे.

सेविले (स्पेन) - सदोष नेमबाजीचा फटका स्पेनला पुन्हा बसला. पेनल्टी किकही दवडलेल्या स्पेनला युरो फुटबॉल स्पर्धेतील पोलंडविरुद्धच्या लढतीत १-१ बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे ते साखळीत बाद होण्याचा धोका आहे.

अल्वारो मोराता याने २५ व्या मिनिटास स्पेनला आघाडीवर नेले. पूर्वार्धात चेंडू दोनदा गोलपोस्टवर लागून परतलेल्या पोलंडने हार मानली नव्हती. रॉबर्टो लेवांडोवस्कीने ५४ व्या मिनिटास बरोबरी साधून दिली. गेरार्डो मॉरेना याने घेतलेल्या पेनल्टी किकवर चेंडू गोलपोस्टवर लागून परतला. रिबाऊंडवर मोराताची किक बाहेर गेली. त्यामुळे स्पेनपाठोपाठ स्वीडनविरुद्धही बरोबरी स्वीकारावी लागली. आता बाद फेरीचे आव्हान कायम राखण्यासाठी स्पेनला स्लोवाकियाविरुद्ध विजय हवाच आहे. पोलंडलाही बाद फेरीसाठी स्वीडनविरुद्ध विजय हवाच आहे.

स्लोवाकियाविरुद्धच्या पराभवामुळे पोलंड स्पेनला आव्हान देईल असे वाटत नव्हते. मात्र स्पेनच्या तुलनेत पोलंड जा्स्त आसुसलेले होते. गोलसाठी प्रसंगी काहीसा धोकाही पत्करत होते. टिका टाका अर्थात छोटे पास करीत स्पेनने चेंडूवर ताबा ठेवला, पण गोलच्या संधी निर्माण करण्यात ते कमी पडले. त्याचाच फटका त्यांना बसत आहे. 

अशी झाली लढत
तपशील           स्पेन     पोलंड

चेंडूवर वर्चस्व     ६९%     ३१%
यशस्वी पास       ६६१       १५०
धाव (किमी)      १०९.८     १०८.४
शॉट््स              ११          ५
ऑन टार्गेट          ५           २
कॉर्नर्स                 ७          १
फाऊल्स            १६          १८

आम्ही स्वतःवरच चिडलो आहोत. आम्ही प्रयत्न केले, पण नशिबाचीही साथ लाभली नाही. पुन्हा एक विजय आमच्या हातून निसटला आहे. आता आमची गटातील अखेरची साखळी लढत अंतिम सामन्यासारखीच असेल.
- जॉर्डी अल्बा, स्पेन कर्णधार.

स्पेनविरुद्धच्या लढतीपूर्वी कोणाचा आमच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. बहुदा अन्य संघांच्या तुलनेत आमची स्पर्धा उशिरा सुरु झाली आहे. स्वीडनविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी तयार आहोत. 
- कामिल ग्रिक, पोलंडचा बचावपटू


​ ​

संबंधित बातम्या