एम्बापेवर विसंबण्याचा फ्रान्सला फटका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 June 2021

किलियन एम्बापेने पेनल्टी किक दवडल्याने विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सला युरो फुटबॉल स्पर्धेतील स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत हार पत्करावी लागली, असे म्हणणे सोपे होईल. प्रत्यक्षात फुटबॉलसारख्या सांघिक खेळात कोणा एका-दोघांवर विसंबून राहता येत नाही, हेच जागतिक विजेत्यांच्या पराभवातून दिसले.

बुखारेस्ट - किलियन एम्बापेने पेनल्टी किक दवडल्याने विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सला युरो फुटबॉल स्पर्धेतील स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत हार पत्करावी लागली, असे म्हणणे सोपे होईल. प्रत्यक्षात फुटबॉलसारख्या सांघिक खेळात कोणा एका-दोघांवर विसंबून राहता येत नाही, हेच जागतिक विजेत्यांच्या पराभवातून दिसले. निर्धारित वेळेतील ३-३ बरोबरीनंतर स्वित्झर्लंडने पेनल्टी शूटआऊट ५-४ जिंकत अखेरच्या आठ संघात स्थान मिळवले. 

एम्बापे हा पेनल्टी किकवर गोल करणारच, हे गृहीत धरून चालत नाही. त्याची किक खराब नव्हती; पण स्वित्झर्लंड गोलरक्षक यान्न सॉमरे याचे कौशल्य जबरदस्त होते. फ्रान्स संघास सॉमरेचे कौशल्य पाहून धक्का बसला नव्हता, तर एम्बापेच्या किकवर गोल कसा झाला नाही, हेच त्यांना समजत नव्हते. खरे तर आपण लढत कशी हरलो, हेही त्यांना समजण्यास वेळ लागला. 

गुणवत्ता, कौशल्य, वैयक्तिक चमक या सर्व बाबतीत फ्रान्स संघ नक्कीच सरस होता; पण स्वित्झर्लंड संघास कितीही कष्ट करण्यास तयार होता. एम्बापेला आधुनिक फुटबॉलमधील सर्वोत्तम युवा खेळाडूच म्हटले जाते. पॉल पोग्बा, एनगॉलो कॉन्ते हे स्पर्धेतील सर्वोत्तम मध्यरक्षक आहेत. करीम बेनझेमासारखा फिनिशर त्यांच्याकडे होता. मात्र १२० पैकी केवळ २५ मिनिटे फ्रान्सने लौकिकास साजेसा खेळ केला. 

जवळपास एक तास फ्रान्सचा खेळ भरकटलेला होता. जगज्जेते होण्यासाठी असलेल्या कणखरतेचा अभाव होता. पूर्वार्धात फ्रान्सला जगज्जेत्यास साजेसा खेळच करता येत नव्हता. ते ०-१ मागे होते. उत्तरार्धात बेनझेमाचे दोन गोल तसेच पोग्बाच्या गोलनी चित्र बदलले. फ्रान्स ३-१ हे पाहून अनेक जण निकाल लागला असेच समजले. मात्र याच वेळी फ्रान्सने प्रतिस्पर्ध्यांनी कमी लेखण्याची चूक केली.

‘आम्ही अजूनही जिंकू शकतो, यावर कोणाचाच विश्वास नव्हता. फ्रान्स संघ तर काहीसा गाफील झाला होता. आपण जिंकलो असेच ते समजत होते. त्याचाच फायदा आम्ही घेतला,’ या स्विस गोलरक्षकाच्या टिप्पणीशी सर्वच सहमत होतील. 

अशी झाली लढत
तपशील          फ्रान्स       स्वित्झर्लंड
 
वर्चस्व              ५३%          ४७%
यशस्वी पास      ६०२            ४९०
धाव (किमी)     १३४.०         १३९.४
गोलचे प्रयत्न       २६             १३
ऑन टार्गेट         ८               ५
कॉर्नर्स              ८               ५
टॅकल्स              ११             १८
फाऊल्स            १४            १३

पेनल्टी दवडली, दोन गोलांनी मागे पडलो, त्या वेळी आज आमचा दिवसच नाही, असे वाटत होते; मात्र आम्ही हार मानली नाही. काहीही झाले, तरी अखेरच्या सेकंदापर्यंत लढत राहायचे हे आम्ही ठरवले होते. फुटबॉलमध्ये कधीही काहीही अशक्य नसते
- यान्न सॉमरे, स्वित्झर्लंड गोलरक्षक


​ ​

संबंधित बातम्या