ईपीएल : ब्रुनोने केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडचा एस्टोन व्हिलावर विजय   

सकाळ स्पोर्ट्स टीम
Sunday, 3 January 2021

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने एस्टोन व्हिलावर दमदार खेळी करत विजय मिळवला आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने एस्टोन व्हिलावर दमदार खेळी करत विजय मिळवला आहे. शनिवारी मँचेस्टर युनायटेड आणि एस्टोन व्हिला यांच्यात झालेला सामना मँचेस्टर युनायटेडने जिंकत यंदाच्या हंगामातील आपल्या दहाव्या विजयाची नोंद केली आहे. व त्यासह मँचेस्टर युनायटेडने यावर्षीच्या आवृत्तीत क्रमवारी मध्ये लिव्हरपूल संघाशी बरोबरी साधली आहे.

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

 मँचेस्टर युनायटेडने आणि एस्टोन व्हिला यांच्यात झालेल्या सामन्यात, मँचेस्टर युनायटेड संघाच्या अँथोनी मार्शलने 40 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बेरट्रान्ड ट्रायॉरेने 58 व्या मिनिटाला गोल करून एस्टोन व्हिला संघाला 1 - 1 ने बरोबरी साधून दिली. मात्र ही बरोबरी एस्टोन व्हिला संघाला फार काळ टिकवून धरता आली नाही. या गोलच्या फक्त तीन मिनिटानंतर मँचेस्टर युनायटेडच्या ब्रुनो फर्नांडिसने 61 व्या मिनिटाला मिळलेल्या पेनल्टीचे गोल मध्ये रूपांतर करून संघाला पुन्हा एका 2 - 1 अशी बढत घेऊन दिली. व सामना संपेपर्यंत ही बढत कायम राखल्याने मँचेस्टर युनायटेड संघाने सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात मँचेस्टर युनायटेडच्या संघाने एस्टोन व्हिलावर  2 - 1 ने विजय मिळवला. 

दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत लिव्हरपूलचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. लिव्हरपूल संघाने 16 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवत 33 अंकांसह पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर आता मँचेस्टर युनायटेडच्या संघाने देखील 16 सामन्यांपैकी 10 लढतीत विजय मिळवलेला आहे. व त्यामुळे त्यांचे देखील 33 अंक झालेले आहेत. परंतु लिव्हरपूल संघापेक्षा मँचेस्टर युनायटेड संघाचे गोल कमी असल्याकारणामुळे मँचेस्टर युनायटेडचा संघ क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर टोटेनहॅम, लिसेस्टर सिटी व एव्हर्टन हे तिन्ही संघांचे गुण 29 आहेत. मात्र यामध्ये टोटेनहॅम संघाचे गोल अधिक असल्यामुळे हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर लिसेस्टर सिटीचा संघ चौथ्या स्थानावर तर एव्हर्टन पाचव्या नंबरवर आहे.     


​ ​

संबंधित बातम्या