इंग्लिश प्रीमिअर लीग : जेम्स मॅडिसनच्या सलग दोन गोलमुळे लिसेस्टर सिटी विजयी   

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत लिसेस्टर सिटी संघाने ब्रायटन संघावर दमदार कामगिरी करत विजय मिळवलेला आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत लिसेस्टर सिटी संघाने ब्रायटन संघावर दमदार कामगिरी करत विजय मिळवलेला आहे. लिसेस्टर सिटी आणि ब्रायटन यांच्यातील सामना लिसेस्टर सिटी संघाने जिंकत यंदाच्या आवृत्तीतील आपला आठवा विजय मिळवला. लिसेस्टर सिटी संघातील जेम्स मॅडिसनने केलेल्या दोन गोलमुळे लिसेस्टर सिटीला ब्रायटनचा 3 - 0 ने पराभव करणे शक्य झाले. लिसेस्टर सिटीने आतापर्यंत बारा सामने खेळले आहेत. आणि  त्यांपैकी आठ सामन्यात विजय मिळवून 24 अंकांसह लिसेस्टर सिटीचा संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.       

शंभराव्या सामन्यात रोनाल्डोचे दोन गोल

लिसेस्टर सिटी आणि ब्रायटन यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात लिसेस्टर सिटी संघाने सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले. लिसेस्टर सिटी संघाचा जेम्स मॅडिसनने खेळाच्या पहिल्या डावाच्या 27 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 41 व्या मिनिटाला जॅमी वर्डीने गोल करून लिसेस्टर सिटी संघाला 2 - 0 ने बढत मिळवून दिली. तर, जेम्स मॅडिसनने पुन्हा 44 व्या मिनिटाला अजून एक गोल केला. त्यामुळे पहिल्या सत्रातच लिसेस्टर सिटीने ब्रायटनवर 3 - 0 ने वर्चस्व मिळवले होते. व सामन्याच्या दुसऱ्या सत्रात लिसेस्टर सिटीने बढत कायम राखल्याने त्यांनी सामना सहजरित्या आपल्या खिशात घातला. ब्रायटन संघाला या सामन्यात एकही गोल नोंदवता आला नाही.           

दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत टोटेनहॅमचा संघ पहिल्या स्थानावर आहे. टोटेनहॅमच्या संघाने 12 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवत 25 अंकांसह पहिले स्थान राखले आहे. त्यानंतर लिव्हरपूल संघाने देखील 12 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. लिव्हरपूल आणि टोटेनहॅम संघाचे गुण समानच 25 आहेत. मात्र टोटेनहॅम संघाने लिव्हरपूल पेक्षा अधिक गोल केलेले असल्यामुळे टोटेनहॅमचा संघ अग्रस्थानी आहे. यानंतर लिसेस्टर सिटीचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर, साऊथहॅम्पटनचा संघ 23 अंकांसह चौथ्या स्थानावर पोहचला असून, चेल्सीचा संघ पाचव्या स्थानावर आहे.  

 


​ ​

संबंधित बातम्या