I League : आघाडी मिळवण्याच्या इराद्याने चर्चिल ब्रदर्स मैदानात उतरणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

सलग चार सामने अपराजित, ट्राऊ संघाविरुद्ध आय-लीग लढत

पणजी : सलग चार सामने अपराजित असलेल्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थान भक्कम करण्याचे ध्येय बाळगले आहे. मणिपूरच्या टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाविरुद्ध त्यांची शुक्रवारी (ता. 29) पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील म्युनिसिपल स्टेडियमवर लढत होईल, त्यावेळी विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाल्यास माजी विजेत्यांची आघाडी वाढण्यास मदत होईल.

चर्चिल ब्रदर्सचे सध्या चार लढतीनंतर 10 गुण आहेत, त्यानंतर ट्राऊ व मोहम्मेडन स्पोर्टिंग यांच्या खाती प्रत्येकी सहा गुण आहेत. चर्चिल ब्रदर्सपाशी सध्या चार गुणांची महत्त्वाची आघाडी आहे. ट्राऊ संघाने मागील लढतीत माजी विजेत्या चेन्नई सिटीला पराभवाचा धक्का दिला होता, त्यामुळे चर्चिल ब्रदर्सला निश्चिंत राहता येणार नाही. मागील लढतीत गोव्याच्या संघाने सुदेवा दिल्ली एफसीवर दोन गोलने मात केली होती.

सामन्याच्या पूर्वसंध्येला गुरुवारी चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी सांगितले, की ‘‘जिंकत राहणे आणि सध्याची वाटचाल कायम राखणे खूप महत्त्वाचे आहे. तथापि, प्रत्येक सामना वेगळा आहे आणि ट्राऊ संघाची फुटबॉल खेळण्याची शैलीही पूर्णतः वेगळी आहे. आम्हाला दक्ष राहावे लागेल. आमची व्यूहरचना अंमलात आणू आणि सकारात्मक निकाल मिळून आघाडी आणखी वाढण्याचा विश्वास वाटतो.’’ ट्राऊ संघाकडे कॉमरॉन तुर्सोनोव, जोसेफ ओलालेये असे चांगले खेळाडू असल्याचे त्यांनी नमूद केले. चर्चिल ब्रदर्सची आघाडीफळीत होडुंरास क्लेव्हिन झुनिगा, स्लोव्हेनियाचा लुका मॅसेन यांच्यावर मदार असेल.

ट्राऊ संघाने शुक्रवारी आणखी एक धक्कादायक निकाल नोंदविल्यास त्यांच्यात व चर्चिल ब्रदर्स यांच्यात एका गुणाचा फरक राहील. ‘‘एखादी चूक महागात पडू शकते आणि चर्चिल ब्रदर्सकडून त्याचा लाभ उठविला जाईल. समतोल आणि तांत्रिकदृष्ट्या सरस असलेल्या संघाविरुद्ध खेळणे नेहमीच कठीण असते. प्रत्येक क्षणी आम्हाला सावध राहावे लागेल,’’ असे ट्राऊ संघाचे प्रशिक्षक नंदकुमार यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या