गतविजेत्या बायर्नला पराभवाचा धक्का; 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच ओढावली नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 April 2021

पीएसजीचा धक्कादायक विजय; एम्बापेचे दोन गोल
 

पॅरिस : चॅम्पियन्स लीगमध्ये गतविजेत्या बायर्न म्युनिचला दोन वर्षांनंतर प्रथमच पराभवाचा धक्का बसला. उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्यात पीएसजीने ३-२ असा विजय मिळवला. यातील दोन गोल विश्वकरंडक हिरो केलियन एम्बापेने केले. मैदानावर बर्फ पडत असताना झालेल्या सामन्यात एम्बापेने ६८ व्या मिनिटाला स्पर्धेतला आपला आठवा गोल केला. त्या अगोदर एरिक मॅक्सिमने ३७ व्या मिनिटाला गोल केला होता. एका तासानंतर थॉमस मुल्लरने गोल करून पीएसजीची आघाडी एका गोलाने कमी केली.

गेल्या दोन वर्षांतला बायर्नचा हा पहिला पराभव होताच त्याचबरोबर मार्गदर्शक हान्सी फ्लिक यांचीही सलग १६ सामन्यांतील अपराजित राहण्याची मालिका संपुष्टात आली. १-२ असे पिछाडीवर असताना बायर्नने सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. रॉब्रेट लेवांडोस्कीऐवजी बदली खेळाडू आलेल्या चोपो माँटिंग आणि मुल्लर यांच्या एकत्रित प्रयत्नाने गोलाची संधी मिळाली. अखेर किमीच्या फ्री किकवर मुल्लरने गोल करून बायर्नला २-२ बरोबरी साधून दिली. 

IPL 2021 : धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

सामना रंगतदार अवस्थेत असताना २२ वर्षीय एम्बापेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सादर केली. बायर्नच्या दोन बचावपटूंना चकवून त्याने गोल केला तोच निर्णायक ठरला. गतवर्षीच्या अंतिम फेरीत पीएसजीला बायर्नविरुद्ध हार पत्करावी लागली होती. त्यामुळे पीएसजी जिद्दीने मैदानात उतरले होते. त्यांचा गोलरक्षक किलॉर नेवास याने  प्रभावी कामगिरी केली. गोलच्या दिशेने असलेल्या शॉटस््मध्ये बायर्न ३१-६ असे सरस होते, पण तरीही पीएसजी जिंकले. आमची हुकुमत बघितल्यास हा सामना आम्ही ६-३ जिंकायला हवा होता, असे थॉम म्यूल्लर म्हणाला.

चेल्सीची सरशी

चेल्सीने पोर्तोला २-० असे पराजित करीत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल केली. पोर्तोची सदोष नेमबाजी चेल्सीच्या पथ्यावर पडली. ही लढत जिंकल्याने चेल्सीला दोन अवे गोलचाही फायदा मिळाला आहे.   या सामन्यातील दोनही लढती कोरोनामुळे सेविलातच होणार आहेत.

रोनाल्डोचा गोल मोलाचा

रोम : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोलमुळे युव्हेंटिसने सिरी ए अर्थात इटलीतील फुटबॉल साखळीत नापोलीचा २-१ असा पराभव केला, पण गतविजेते युव्हेंटिस आणि आघाडीवरील इंटर मिलान यांच्यातील १२ गुणांचे अंतर कायम राहिले. रोमेलू लुकाकूच्या चमकदार कामगिरीमुळे इंटर मिलानने सासुओलाचा २-१ असा पराभव केला. त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरील एसी मिलानला ११ गुणांनी मागे टाकले आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या