अवे गोलमुळे बरोबरीतही चेल्सी वरचढ

यूएनआय
Thursday, 29 April 2021

सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही चेल्सीला रेयाल माद्रिदविरुद्धच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत १-१ बरोबरीवर समाधान मानावे लागले; मात्र अवे गोलमुळे चेल्सी घरच्या मैदानावरील लढतीच्या वेळी मानसिक वर्चस्व राखील.

चॅम्पियन्स लीग लढत - घरच्या मैदानावरील सामन्यात रेयाल माद्रिद निष्प्रभ
माद्रिद - सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही चेल्सीला रेयाल माद्रिदविरुद्धच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत १-१ बरोबरीवर समाधान मानावे लागले; मात्र अवे गोलमुळे चेल्सी घरच्या मैदानावरील लढतीच्या वेळी मानसिक वर्चस्व राखील.

ख्रिस्तियन पुल्कीक याने १४ व्या मिनिटास चेल्सीला आघाडीवर नेले होते; पण करीम बेनझेमाने विश्रांतीपूर्वी काही मिनिटे रेयाल माद्रिदला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात प्रतिस्पर्ध्यांचे गोलचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे ही पहिल्या टप्प्याची लढत बरोबरीत सुटली. आता प्रतिस्पर्ध्यातील परतीची लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्यास चेल्सी अवे गोलाच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश करतील. 

पावसात तसेच प्रसंगी भूरभूर बर्फ पडत असताना झालेल्या या लढतीत चेल्सीची हुकूमत होती; पण त्यांना या वर्चस्वाचे गोलात रूपांतर करण्यात अपयश आले. चेल्सी पूर्ण हुकूमत घेणार, असे वाटत असतानाच बेनझेमाने गोल करीत रेयालच्या प्रतिकारात जान आणली. उत्तरार्धात चेल्सीला काकणभरच वर्चस्व राखता आले. 

रेयालला घरच्या मैदानावर सुरुवातीच्या काही मिनिटात सूरच गवसला नव्हता. त्याचा फायदा चेल्सी घेणार, अशीच चिन्हे दिसत होती; पण त्या कालावधीत त्यांनी एकच गोल करताना किमान दोन संधी दवडल्या. पूर्वार्धातच आम्ही निकाल निश्चित करायला हवा होता, ही चेल्सी मार्गदर्शक थॉमस टशल यांची प्रतिक्रिया हेच सांगते. पूर्वार्धातील अपयशावर आम्ही उत्तरार्धात मात केली, असे सांगत रेयाल मार्गदर्शक झिनेदीन झिदान स्वतःलाच दिलासा देत होते. 

लक्षवेधक

  • थॉमस टशेल यांनी मार्गदर्शक असताना रेयाल माद्रिदविरुद्ध हार पत्करलेली नाही. 
  • चेल्सी गेल्या पाच चॅम्पियन्स लीग उपांत्य लढतीत अवे सामना जिंकण्यात अपयशी
  • रेयाल गेल्या चार सामन्यात चेल्सीला हरवण्यात अपयशी (दोन बरोबरी, दोन पराभव)
  • रेयालचा टार्गेट ऑन शॉट अवघा एक. वीस वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची खराब कामगिरी
  • चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य लढतीत गोल केलेला ख्रिस्तियन पुल्सीक हा पहिला अमेरिकन.

​ ​

संबंधित बातम्या