बार्सिलोनाचे लिओनेल मेस्सीनंतरचे पर्व सुरू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 August 2021

सुपरस्टार लिओनेल मेस्सीला साश्रुनयनांनी निरोप दिल्यानंतर काही वेळात मैदानात उतरणाऱ्या बार्सिलोनाच्या खेळाडूंनी मेस्सीनंतरच्या युगास यशस्वीपणे सुरुवात केली.

बार्सिलोना - सुपरस्टार लिओनेल मेस्सीला साश्रुनयनांनी निरोप दिल्यानंतर काही वेळात मैदानात उतरणाऱ्या बार्सिलोनाच्या खेळाडूंनी मेस्सीनंतरच्या युगास यशस्वीपणे सुरुवात केली. मेस्सीचा कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटस संघाबरोबरच्या मोसमपूर्व सामन्यात ३-० अशा शानदार विजयही मिळवला.

बार्सिलोना-युव्हेंटस म्हणजेच मेस्सी विरुद्ध रोनाल्डो यांच्यातील हा मोसमपूर्व सामना कधीच नियोजित झाला होता. युरो आणि कोपा स्पर्धेनंतर फुटबॉल विश्वाचे सर्व लक्ष या लढतीकडे लागून राहिले होते, परंतु मेस्सी आणि बार्सिलोना दोघेही एकमेकांपासून दूर झाल्यामुळे लढतीची उत्कंठा कमी झाली होती, परंतु मेस्सीशिवाय खेळणाऱ्या बार्सिलोनाने रोनाल्डो खेळत असूनही युव्हेंटसला पराभूत केले.

बार्सिलोनाकडून मेंफिस डिपे, मार्टिन ब्राथवेट आणि रिकी पिग यांनी गोल केले. जॉन क्रुफ स्टेडियम ही लढत सुरू होण्याअगोदर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या २६०० प्रेक्षकांनी मेस्सी... मेस्सी... असा घोष सुरू केला होता. 

रोनाल्डोच्या पायात जेव्हा जेव्हा चेंडू येत होता तेव्हा तेव्हा हे प्रेक्षक मेस्सी... मेस्सी असे म्हणायचे. हा सरावासारखा सामना असल्यामुळे रोनाल्डो पहिल्याच अर्धात खेळला. यादरम्यान त्याला दोनदा गोल करण्याची संधी मिळाली होती, पण बार्सिलोनाचा बचाव खेळाडू सेर्गिनो डेस्टने रोनाल्डोचे प्रयत्न फोल ठरवले.

मेस्सीचे बार्सिलोनाशी नाते आता तर संपलेले आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे काही प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकले नाहीत. यात सर्जिओ अग्युरो, एरिक ग्रासिया, उदयोन्मुख पेद्री यांचा समावेश होता.


​ ​

संबंधित बातम्या