ॲटलेटिकोच्या पराभवाने बार्सिलोनाला आशा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 April 2021

ॲटलेटिकोच्या पराभवामुळे बार्सिलोनाच्या विजेतेपद जिंकण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

माद्रिद : ॲटलेटिको माद्रीदला ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत सेविलाविरुद्ध ०-१ हार पत्करावी लागली. ॲटलेटिकोच्या पराभवामुळे बार्सिलोनाच्या विजेतेपद जिंकण्याच्या आशा उंचावल्या आहेत. मार्कोस ॲक्यूना याने हेडरवर केलेल्या गोलमुळे सेविलाने बाजी मारली; मात्र त्यापेक्षा यामुळे ॲटलेटिकोची अव्वल क्रमांकावरील पकड अधिक ढिली झाली असल्याचे दिसले. या पराभवामुळे ॲटलेटिको आणि रेयाल माद्रिद यांच्यातील फरक तीन गुणांचा झाला. रेयालने एईबारला हरवून आपल्या आशा उंचावल्या. बार्सिलोनाने रेयाल वॅलादॉलिदला पराजित केल्यास ॲटलेटिको आणि बार्सिलोनातील फरक एका गुणाचा होईल. दोन महिन्यांपूर्वी ॲटलेटिको बार्सिलोना तसेच रेयाल माद्रिदला १० गुणांनी मागे टाकले होते आणि ते एक लढत कमी खेळले होते; मात्र त्यानंतरच्या १२ पैकी चारच लढती त्यांनी जिंकल्या आहेत. त्यांचे चॅम्पियन्स लीगमधील आव्हान चेल्सीविरुद्धच्या पराभवामुळे यापूर्वीच आटोपले आहे.

युनायटेडची सरशी

लंडन ः मँचेस्टर युनायटेडने पिछाडीनंतर ब्रायटनला २-१ असे पराजित केले. अर्थात, यानंतरही आघाडीवरील मँचेस्टर सिटी आणि युनायटेड यांच्यात १४ गुणांचा फरक आहे. दरम्यान, न्यू कॅसलविरुद्धच्या २-२ बरोबरीमुळे टॉटनहॅमच्या अव्वल चारच्या आशा उंचावल्या आहेत. पूर्वार्धातील फायदा घेण्यात ब्रायटन पुन्हा अपयशी ठरले, तर युनायटेडने पुनश्च उत्तरार्धात खेळ उंचावला. युनायटेडला सिटीवरील दडपण कायम ठेवल्याचेच समाधान लाभले. सिटीला विजेतेपद निश्चितीसाठी उर्वरित सात सामन्यांत ११ गुणच हवे आहेत. साऊदम्प्टनने प्रीमिअर लीगमध्ये स्थान राखण्याच्या आशा उंचावताना बर्नलीचा ३-२ पराभव केला. भारत भारत 
 


​ ​

संबंधित बातम्या