मेस्सी - रोनाल्डो एकमेकांविरुद्ध उतरणार मैदानात

संजय घारपुरे
Monday, 7 December 2020

तब्बल दोन वर्षांनी मेस्सी - रोनाल्डो हे फुटबॉल स्टार एकमेकांविरुद्ध भिडणार 

बार्सिलोना : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात उद्या (ता. 8) चॅम्पियन्स फुटबॉल लीगमधील चकमक झडणार आहे. बार्सिलोना आणि युव्हेंटिस यांच्यातील लढतीपेक्षा मेस्सी सरस ठरणार की रोनाल्डो याचीच चर्चा जास्त होणार आहे. 

इंग्लिश प्रीमिअर लीग : टोटनहॅमचा आर्सेनलवर दमदार विजय

रोनाल्डो युव्हेंटिसकडे गेल्यानंतर प्रथमच प्रतिस्पर्ध्यांत चकमक झडणार आहे. रोनाल्डो रेयाल माद्रिदकडून खेळत असताना स्पॅनिश लीगमधील बार्सिलोना-रेयाल माद्रिद लढत आकर्षण असे. रोनाल्डोने इटलीतील युव्हेंटिसबरोबर खेळण्याचे ठरवल्यावर दोघांतील लढतच झाली नाही. चॅम्पियन्स लीगमध्ये रोनाल्डो आणि मेस्सीचा संघ एकाच गटात आल्याने चाहत्यांना त्यांच्यातील लढतीचे वेध लागले. मात्र रोनाल्डो कोरोना बाधित असताना बार्सिलोनाने युव्हेंटिसला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले होते. आता याचा वचपा काढण्याचा युव्हेंटिसचा प्रयत्न असेल. 

रोनाल्डो या मोसमात चांगलाच बहरात आहे. त्याने संघाकडून सातत्याने गोल केले आहेत. त्याचवेळी बार्सिलोनाची कामगिरी ला लिगामध्ये खालावली आहे. मेस्सीने स्पॅनिश लीगमध्ये या मोसमात अवघे दोन गोल केले आहेत. रोनाल्डोच्या चाहत्यांनी त्यातच मेस्सीच्या चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आकडेवारी जाहीर केली आहे. मेस्सीने या मोसमात 24 गोल केले आहेत, तर रोनाल्डोचे पेनल्टी किकविना केलेले गोलच 25 आहेत. अर्थात दोघांत लढत असताना यापूर्वीच्या आकडेवारीस काहीही महत्त्व नसते. 

ला लिगा : बार्सिलोनाची ला लिगा पीछेहाट कायम 

ला लिगामध्ये बार्सिलोना अपयशी असले तरी चॅम्पियन्स लीगच्या गटात ते अग्रस्थानी आहेत. गटातील अव्वल स्थान राखण्यासाठी त्यांना युव्हेंटिसविरुद्धची बरोबरी पुरेशी आहे. याचबरोबर दोघांतील थेट निकालात सरस ठरण्यासाठी युव्हेंटिसला किमान 3-0 विजय हवा आहे. 

थेट प्रक्षेपण : आज मध्यरात्री 1.30 पासून सोनी सिक्‍स


​ ​

संबंधित बातम्या