लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाला मिळवून दिले विजेतेपद

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

बार्सिलोनाने अंतिम सामन्यात ॲथलेटिको बिलबाओ संघाचा ४-० असा पराभव केला. यातील दोन गोल मेस्सीने केले.

बार्सिलोना - सुपरस्टार लिओनेल मेस्सीने अखेर बऱ्याच कालावधीनंतर बार्सिलोनाला विजेतेपद मिळवून दिले. कोपा डेल रे करंडक जिंकताना बार्सिलोनाने अंतिम सामन्यात ॲथलेटिको बिलबाओ संघाचा ४-० असा पराभव केला. यातील दोन गोल मेस्सीने केले. केलेले दोन गोल आणि उत्साहाने उंचावलेला विजेतेपदाचा करंडक यामुळे मेस्सी बार्सिलोनातच राहणार असल्याची खात्री बार्सिलोनाच्या पाठीराख्यांना मिळत होती, परंतु विजेतेपदाचा करंडक स्वीकारत असताना मेस्सीने बार्सिलोनातील आपल्या भविष्याबाबत भाष्य केले नाही. स्पेनचे राजे फिलिप-VI यांच्यासह स्पेनचे प्रंतप्रधान पेद्रो सँचेझ उपस्थित होते.

प्रदीर्घ कालावधीनंतर मिळालेल्या या विजेतेपदाबद्दल मेस्सी भलताच खूश होता. मोकळेपणाने तो व्यक्त होत होता. हा करंडक माझ्यासाठी खास महत्त्वाचा आहे असे मेस्सीने सांगितले. कुटुंब किंवा चाहत्यांसह हा आनंद साजरा करू शकत नसल्याचीही खंत त्याने व्यक्त केली. भविष्याबद्दल बोलणे मेस्सीने टाळले असले तरी या अंतिम सामन्यात त्याने स्वतःला झोकून देऊन केलेला खेळ बार्सिलोनाच्या चाहत्यांना मात्र दिलासा देणारा ठरला.

बार्सिलोना क्लबच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त झालेले जोआन लापोर्ता यांनी मेस्सीवर स्तुतिसुमने उधळली. लिओ हा फुटबॉल विश्वातील सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याची पाळेमुळे येथेच खोलवर रुजलेली आहेत, त्याने या क्लबमध्येच राहावे अशी आमची इच्छा आहे, असे लापोर्ता म्हणाला. बार्सिलोनाचे हे ३१ वे विजेतेपज आहे. मेस्सीसह बार्सिलोनालाही विजेतेपदाचा दुष्काळ लागलेला असताना मिळालेले हे यश दोघांसाठी महत्त्वाचे आहे. कोरोना महामारीमुळे मोठा आर्थिक फटका क्लबला बसला आहे, त्यातच गेल्या मोसमात संघाच्या झालेल्या खराब कामगिरीमुळे जोसेफ बार्तमोऊ यांना क्लब अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. २०१९ मध्ये बार्सिलोनाने ला लीगा जिंकली होती.

१४ दिवसांत दोनदा कप गमावला
ॲथलेटिको बिलबाओसाठी १४ दिवसांच्या अंतराने एकाच करंडकासाठी बसलेला हा दुसरा धक्का आहे. कोरोना महामारीमुळे गतवर्षीच्या कोपा डेल रे स्पर्धेचा लांबणीवर टाकण्यात आलेला अंतिम सामना १४ दिवसांपूर्वी झाला. बिलाओने त्यातही अंतिम फेरी गाठली होती, परंतु रियाल सोसेदाद संघाने त्यांचा १-० असा पराभव कला.


​ ​

संबंधित बातम्या