आशियाई महिला फुटबॉल पुढील वर्षी महाराष्ट्रातच

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 June 2021

जगभरात युरो फुटबॉलची धूम सुरू असताना महाराष्ट्रात फुटबॉलला चालना मिळावी यासाठी आशिया खंडातील महिलांसाठी एएफसी २०२२  या सर्वांत मोठ्या फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राने स्वीकारले आहे.

मुंबई - जगभरात युरो फुटबॉलची धूम सुरू असताना महाराष्ट्रात फुटबॉलला चालना मिळावी यासाठी आशिया खंडातील महिलांसाठी एएफसी २०२२  या सर्वांत मोठ्या फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राने स्वीकारले आहे. पुढच्या वर्षी मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी येथे हे सामने २० जानेवारी २०२२ ते ६ फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत.

एएफसी महिला आशिया कप २०२२ या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. इतर संभाव्य सहभागींमध्ये कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होणार आहे.

सह्याद्री अतिथिगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप २०२२ स्पर्धेच्या तयारीचा आढावा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी घेतला. या वेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई जिल्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध यंत्राणांना सूचित करण्यात येईल. यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, निवास अशा सर्व सुसज्ज सुविधा पुरवण्यात येईल. सर्व स्टेडियमच्या इमारतींची जर काही डागडुजी करणे गरजेचे असेल, तर ती वेळेत करून घ्यावी, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.


​ ​

संबंधित बातम्या