अर्जेंटिनाच! जेतेपदांचा दुष्काळ संपवला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 July 2021

अर्जेंटिना विजेते, लिओनेल मेस्सीही विजेता. अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलला हरवून विजेतेपद जिंकल्यानंतर अर्जेंटिनातील प्रत्येकाची हीच भावना होती. अखेर मेस्सीने तसेच अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.

रिओ द जानेरिओ - अर्जेंटिना विजेते, लिओनेल मेस्सीही विजेता. अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलला हरवून विजेतेपद जिंकल्यानंतर अर्जेंटिनातील प्रत्येकाची हीच भावना होती. अखेर मेस्सीने तसेच अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.

निळ्या-पांढऱ्या पट्ट्याचे शर्ट परिधान केलेल्या खेळाडूंनी विजेतेपद उंचावण्याची घटना २८ वर्षांनंतर पहिल्यांदा घडली होती. त्यांचा स्टार खेळाडू मेस्सी प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विजेता ठरला होता. कोपा अमेरिका स्पर्धेत केवळ दुसरा सामना खेळणाऱ्या अँगेल डे मारियाच्या पूर्वार्धातील गोलने अर्जेंटिनास ऐतिहासिक यश मिळवून दिले होते.

रॉद्रिगो डे पॉलने दूर अंतरावरून उंचावरून दिलेल्या पासवर ब्राझीलचा बचावपटू रेना लॉदी चेंडूवर ताबा घेऊ शकला नाही आणि त्याचा फायदा घेत डे मारियाने एका जागेवर खिळलेला ब्राझीलचा गोलरक्षक एंडरसनला चकवले. त्यानंतर अर्जेंटिनात सुरू झालेला जल्लोष थांबलाच नाही. अर्जेंटिनाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी ब्राझीलने उत्तरार्धात पाच आक्रमकांसह आक्रमण केले, पण अर्जेंटिनाचा बचाव भक्कम राहिला. पूर्वार्धात आम्हाला खेळ करण्यापासून रोखतानाच अर्जेंटिनाने हुकुमत घेतली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशी कबुली ब्राझीलचा बचावपटू थिएगो सिल्वास देणे भाग पडले; मात्र त्यानंतर त्याच्यातील अर्जेंटिनाद्वेष दिसला. उत्तरार्धात एकच संघ फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करीत होता, तर अन्य संघ वेळ घालवत होता, असे त्याने सुनावले.

अर्जेंटिनास ब्राझील खेळाडू काय बोलतात याची फिकीर नव्हती. त्यांनी आपला स्टार खेळाडू मेस्सीला तीनदा हवेत उडवत आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांना आपला जगातील सर्वोत्तम खेळाडू मेस्सीला विजेतेपदाची भेट दिली याचा आनंद होता. आश्चर्य म्हणजे मेस्सीचा अंतिम सामन्यात प्रभावच पडला नाही. ब्राझीलने त्याची कोंडी केली आणि त्याचे सहकारी त्यामुळे मुक्त खेळत असल्याने त्यास पसंती दिली. दोन मिनिटे असताना त्याने गोलची संधी दवडली.

ब्राझील-अर्जेंटिना हे ताकदवान प्रतिस्पर्धी असूनही सर्वोत्तम खेळ  क्वचितच झाला. शरीरवेधी खेळावर जास्त भर होता. पूर्वार्धात २१ फाऊल झाले होते. ब्राझीलने उत्तरार्धात रंगत आणली, पण अतिआक्रमणाचा फटका बसू शकेल हे लक्षात आल्यावर त्यांनीही त्याचा वेग काहीसा कमी केला. अर्थात कोपा अमेरिका स्पर्धेत विजेतेपद तेही हरवून यापेक्षा सच्चा अर्जेंटिना चाहत्याची अपेक्षापूर्ती झाली. 

लक्षवेधक

  • अर्जेंटिनाने २८ वर्षांनंतर प्रमुख स्पर्धेतील विजेतेपद जिंकले
  • अर्जेंटिनाकडून खेळताना मेस्सीचे १५० सामन्यांत ७६ गोल, ५७ साह्य
  • अर्जेंटिनाने १५ व्यांदा कोपा अमेरिका विजेतेपद जिंकले, उरुग्वेच्या सर्वाधिक विजेतेपदांशी बरोबरी, पहिले विजेतेपद १९२१ मध्ये
  • अर्जेंटिनाने ब्राझीलला ब्राझीलमध्ये तीन वर्षांनंतर पराजित केले. त्यापूर्वीच्या तीन सामन्यांत एकही गोल नाही. यापूर्वीचा अर्जेंटिनाचा ब्राझीलमधील ब्राझीलविरुद्धचा स्पर्धेतील गोल १९७९ मध्ये
  • अंतिम सामन्यात क्युटी रामोस हा अर्जेंटिनाचा सर्वोत्तम अचूक खेळाडू. त्याचे ३४ पास अचूक
  • टीटे मार्गदर्शक असताना ब्राझीलची प्रथमच हार; त्यापूर्वी २४ सामन्यांत २१ विजय

अशी झाली लढत
तपशील    अर्जेंटिना        ब्राझील

चेंडूवर वर्चस्व    ४१%        ५९%
शॉट    ६         १३
ऑन टार्गेट     २         २
कॉर्नर्स      १         ४
फाउल्स    १९         २२


​ ​

संबंधित बातम्या