चमकदार गोलनंतरही लिओनेल मेस्सी संतप्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 June 2021

लिओनेल मेस्सीने आपण सुपरस्टार असल्याचे दाखवून देताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील चिलीविरुद्धच्या लढतीत अप्रतिम गोल केला, पण त्याला सहकाऱ्यांची नियंत्रित साथ न लाभल्याने अर्जेंटिनाला बरोबरीवर समाधान मानावे लागले.

साओ पावलो - लिओनेल मेस्सीने आपण सुपरस्टार असल्याचे दाखवून देताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील चिलीविरुद्धच्या लढतीत अप्रतिम गोल केला, पण त्याला सहकाऱ्यांची नियंत्रित साथ न लाभल्याने अर्जेंटिनाला बरोबरीवर समाधान मानावे लागले.

गोलक्षेत्रापासून काही मीटरवर मिळालेल्या फ्री किकवर मेस्सीने चेंडूस अफलातून फिरक दिली आणि बचाव भिंतीस चकवले आणि अर्जेंटिनास विश्रांतीस आघाडीवर नेले, पण अर्जेंटिना उत्तरार्धात निष्प्रभ ठरले. त्यांच्या गोलरक्षकाने आर्तुरो विदालची पेनल्टी किक रोखली, पण काही मिनिटांतच अर्जेंटिनास बरोबरीचा गोल स्वीकारावा लागला. वर्चस्वाचे विजयात रूपांतर न झाल्याने मेस्सी निराश होता. आम्ही शांतपणे खेळच केला नाही. योग्य प्रकारे चेंडूवर नियंत्रणच राखले नाही, अशी टीका मेस्सीने केली. अर्जेंटिना मार्गदर्शक लिओनेल स्कालोनी यांनी थेट टिका टाळली. आम्ही जिंकू शकणारी लढत बरोबरीत सोडवली, पण खडतर स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात हे घडू शकते असे ते म्हणाले.

पॅराग्वेची विजयी सलामी
पॅराग्वेने विजयी सलामी देताना बोलिव्हियाचा ३-१ असा पराभव केला. सुरुवातीच्या पिछाडीनंतर पॅराग्वे आक्रमक झाले आणि अँगेल रोमारिओ याने दोन गोल करीत पॅराग्वेचा विजय सुकर केला. यामुळे पॅराग्वेने कोलंबियावरील १९६३ पासूनची या स्पर्धेतील हुकुमत कायम ठेवली, पण त्यांनी तीन सामन्यांनंतर बोलिव्हियाविरुद्ध गोल स्वीकारला. पॅराग्वेने गोलपोस्टच्या दिशेने ३४ शॉटस् मारले त्यावरून त्यांचे वर्चस्व लक्षात येईल.

तब्बल ४१ जण बाधित
या स्पर्धेशी संबंधित ४१ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात ३१ खेळाडू अथवा सपोर्ट स्टाफपैकी आहेत, असे ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. ब्रासिलिया येथील स्टेडियमशी संबंधित १० कर्मचारीही बाधित आहेत. या स्पर्धेशी संबंधित दोन हजार ९२७ जणांची आतापर्यंत चाचणी झाली आहे. पेरू संघाचे फिटनेस मार्गदर्शक कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते ब्राझीलला आलेले नाहीत. ब्राझील आरोग्य मंत्र्यांनी स्पर्धेच्या सहभागी संघातील ३१ बाधित आहेत असे सांगितले असले, तरी त्याचा तपशील दिलेला नाही; मात्र कोलंबियाने आपल्या संघातील एक तांत्रिक सल्लागार तसेच एक फिजिओ बाधित असल्याचे सांगितले.

अर्जेंटिना १............... चिली १
पॅराग्वे ३............ बोलिव्हिया १
आज तसेच उद्या सामने नाहीत


​ ​

संबंधित बातम्या