‘ग्रुप ऑफ डेथ’मधील सर्व संघ गारद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 July 2021

जगज्जेते फ्रान्स, गतविजेते पोर्तुगाल आणि फुटबॉलमधील ताकद जर्मनी हे एकाच फ गटात असल्यामुळे त्यास ग्रुप ऑफ डेथ समजले जात होते; मात्र या खडतर गटातून बाद फेरी गाठलेला एकही संघ युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नसेल.

लंडन - जगज्जेते फ्रान्स, गतविजेते पोर्तुगाल आणि फुटबॉलमधील ताकद जर्मनी हे एकाच फ गटात असल्यामुळे त्यास ग्रुप ऑफ डेथ समजले जात होते; मात्र या खडतर गटातून बाद फेरी गाठलेला एकही संघ युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नसेल.

१९६६ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम लढतीत इंग्लंडने जर्मनीस वेम्बले स्टेडियमवर २-० असे हरवले होते. त्याचीच आठवण या वेळच्या विजयाने करून दिली.

साखळीतील इंग्लंडचे दोन्ही गोल केलेल्या रहीम स्टर्लिंगने ७५ व्या मिनिटास खाते उघडत इंग्लंडवरील दडपण कमी केले. हॅरी केनने ८६ व्या मिनिटास हेडर करीत इंग्लंड यंदाच्या स्पर्धेत एका सामन्यात एकापेक्षा जास्त गोल करू शकतात हे दाखवले. कमालीचे दडपण असताना आम्ही चांगला खेळ केला, या केनच्या मताशी सर्वच सहमत होते.

श्रेय साऊथगेट यांना
इंग्लंडच्या यशाचे श्रेय मार्गदर्शक गेरेथ साऊथगेट यांना द्यायला हवे. गोलशून्य बरोबरीचे दडपण वाढत होते. त्या वेळी त्यांनी ७० व्या मिनिटास जॅक ग्रिलीश याला बुकायो सॅका याच्याऐवजी मैदानात उतरवले.

वेगवान आक्रमणात वाकबगार असलेल्या ग्रिलीश लेफ्ट विंगर म्हणून आला होता. त्याच्या कौशल्यामुळे जर्मनीस त्याच्या बाजूस लक्ष द्यावे लागले. याच ग्रिलीशच्या अचूक पासवर ल्युक शॉने स्टर्लिंगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली होती. दुसऱ्या गोलच्या वेळी त्याने जर्मनी बचावपटूंमधून चेंडू केनकडे सोपवला होता. 

चेंडू गोलक्षेत्रात अचूक पोहोचवण्याच्या ग्रिलिशच्या कौशल्याने चित्र बदलले होते. याच ग्रिलीशच्या पासवर इंग्लंडने चेक प्रजासत्ताकविरुद्धचा गोल केला होता.

जर्मनीची होती नेहमीच सरशी
जर्मनी कधीही यापूर्वी उपांत्यफेरीपूर्वी पराजित झाले नव्हते. त्यातच इंग्लंडचे जर्मनीविरुद्धचे विजय कायम वादग्रस्त निर्णयाने झाकोळलेले असत. या वेळी असे काहीही घडले नाही. 

ग्रुप ऑफ डेथमधील संघांची हार
फ्रान्स अव्वल - स्वित्झर्लंडविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-५ हार. (स्वित्झर्लंड अ गटात इटली, वेल्सपाठोपाठ तिसरे)
जर्मनी दुसरे - इंग्लंडविरुद्ध ०-२ पराभव (इंग्लंड ड गटात अव्वल)
पोर्तुगाल तिसरे - बेल्जियमविरुद्ध ०-१ हार. (बेल्जियम ब गटात अव्वल)


​ ​

संबंधित बातम्या