जागतिक फुटबॉल लीगमध्ये उलथापालथ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 April 2021

भूतलावर सर्वाधिक लोकप्रियता असलेला फुटबॉल आणि क्लब फुटबॉल लीगमध्ये मोठी उलथापालथ होण्याच्या मार्गावर आहे.

पॅरिस  - भूतलावर सर्वाधिक लोकप्रियता असलेला फुटबॉल आणि क्लब फुटबॉल लीगमध्ये मोठी उलथापालथ होण्याच्या मार्गावर आहे. सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असलेल्या चॅम्पियन्स लीगला समांतर अशी युरोपियन सुपर लीग होऊ घातली आहे. क्लब फुटबॉलमधील मातब्बर अशा १२ क्लबनी मिळून ही बंडखोर लीग तयार केली आहे. यूएफा (युपोपियन फुटबॉल महासंघ) आणि फिफा (जागतिक फुटबॉल महासंघ) यांनी अर्थातच आक्षेप घेतला आहे.  जागतिक फुटबॉलमध्ये उलथापालथ होणारी ही घटना आहे. 

मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, आर्सनेल, चेल्सी, टॉटेनहॅम या सहा प्रीमियर लीगमधील क्लबनी पुढाकार घेऊन नवी युरोपियन सुपर लीग तयार केली आहे. लिओनेल मेस्सीचा बार्सिलोना आणि त्याचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले रेयाल माद्रिद,  ख्रिस्तियानो रोनाल्डो खेळत असलेला युव्हेंटिस, ॲथलेटिको माद्रिद, इंटर मिलान आणि एसी मिलान यांनीही या लीगला पाठिंबा दिला असून खेळण्याचेही मान्य केले आहे. 

क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जर्मनीचे ताकदवर संघ ड्रॉटमंड, बायर्न म्युनिच या क्लबसह नेमार आणि एम्बापे खेळत असलेल्या पीएसजीने मात्र या नव्या लीगशी नाते जोडलेले नाही. ईएसएल (युरोपियन सुपर लीग) या नावाने होणाऱ्या या लीगचे सामने आठवड्याच्या मध्यावर होतील आणि वीकेंडला हे क्लब आपापल्या राष्ट्रीय लीग सामने खेळतील. जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर ही ईएसएल सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

चॅम्पियन्स लीगचे विस्तारीकरण आणि नवा ढाचा युरोपियन फुटबॉल महासंघाकडून तयार करण्यचे वृत्त प्रसिद्ध होत असतानाच २४ तासांतच या बंडखोर लीगची घोषणा झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या लीगची आज घोषणा करण्यात आली असली, तरी गेल्या काही महिन्यांपासून हालचाली सुरू होत्या. अशी लीग तयार झाल्यास आम्ही त्याचे सदस्य होऊ, असे बार्सिलोनाचे माजी अध्यक्ष जोसेप बर्तोमोऊ यांनी ऑक्टोबरमध्येच सांगितले होते. 

हे वाचा - धोनी इतका तंदुरुस्त कसा काय? जाणून घ्या रहस्य 

  • मँचेस्टर सिटी, युनायटेडसह बार्सिलोना, रेयाल माद्रिदही खेळणार
  • फिफाने बंदी घातली तर मेस्सी, रोनाल्डो वर्ल्डकपपासून दूर?
  • जर्मनीतील क्लब मात्र बंडखोर लीगपासून लांब

कशी असणार लीग

  • २० संघांचा सहभाग
  • १२ संस्थापक संघ, तीन क्लबची प्रतीक्षा
  • स्थानिक स्पर्धांतील कामगिरीनुसार इतर पाच संघ
  • ऑगस्टमध्ये स्पर्धेला सुरुवात
  • प्रत्येकी दहा संघांची दोन गटांत विभागणी होम आणि अवे धर्तीवर सामने
  • दोन्ही गटांतील पहिले तीन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र. इतर दोन जागांसाठी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील संघात सामने
  • त्यानंतर अंतिम सामन्यापर्यंत दोन लीगच्या लढती

​ ​

संबंधित बातम्या