रोनाल्डोला हरवले आता फ्रान्सला नमवणार? एम्बापेची कोंडी करण्यास उरुग्वेचा बचाव सज्ज

वृत्तसंस्था
Friday, 6 July 2018

फुटबॉल जगतातील प्रथितयश स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केल्यानंतर उरुग्वेचा बचाव फ्रान्स तसेच त्यांचा वेगाने लोकप्रिय होत असलेला स्टार एम्बापे याची कोंडी करण्यास उत्सुक आहे. भक्कम बचाव ही खासियत असलेले उरुग्वे दक्षिण अमेरिकेची फुटबॉलमधील ताकद दाखवण्यास उत्सुक असतील. 

निझनी नोवगोरोड- फुटबॉल जगतातील प्रथितयश स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केल्यानंतर उरुग्वेचा बचाव फ्रान्स तसेच त्यांचा वेगाने लोकप्रिय होत असलेला स्टार एम्बापे याची कोंडी करण्यास उत्सुक आहे. भक्कम बचाव ही खासियत असलेले उरुग्वे दक्षिण अमेरिकेची फुटबॉलमधील ताकद दाखवण्यास उत्सुक असतील. 

एडिसन कॅवानी याच्या दोन गोलपेक्षा उरुग्वेच्या पोर्तुगालवरील विजयात रोनाल्डोची कोंडी जास्त मोलाची ठरली होती. स्पर्धेत आत्तापर्यंत केवळ एकच गोल स्वीकारलेले उरुग्वे अर्जेंटिनाविरुद्ध चार गोल केलेल्या फ्रान्सच्या मुसक्‍या बांधण्यास उत्सुक असेल. अँतॉईन ग्रिएझमन, ऑलिव्हर गिरॉड आणि किलान एम्बापे या फ्रान्स आक्रमकांनाही उरुग्वेचा बचाव भक्कम असल्याची चांगलीच जाणीव आहे. एम्बापेने अर्जेंटिनाविरुद्ध दोन गोल केले होते, पण त्यापेक्षाही त्याची 70 मीटरची पेनल्टी किक मिळवणारी धाव लक्षणीय ठरली होती. अर्थात याची पुनरावृत्ती उरुग्वेविरुद्ध अवघड असल्याची फ्रान्सला जाणीव आहे. 

उरुग्वेचा सराव बघितला तर त्यांना फ्रान्स आक्रमकांची चिंता आहे असे वाटत नाही. जोस गिमेनेझ आणि दिएगो गॉडीन हे उरुग्वेचे मध्यरक्षक आपल्या ऍटलेटिको संघातील सहकारी ग्रिएझमेन तसेच एम्बापेला रोखण्यास नक्कीच समर्थ आहेत. फ्रान्सला आक्रमणासाठी जागाच देणार नाही. हे केल्यास त्यांचे आक्रमक निष्प्रभ होतील, हे आम्ही अनेकदा केले आहे, असे उरुग्वेचा मध्यरक्षक दिएगो लॅक्‍साल्त याने सांगितले. 

लुईस सुआरेझ आणि एडिसन कॅवानी हे उरुग्वेचे अष्टपैलू खेळाडू फ्रान्सची झोप नक्कीच उडवत आहेत. उरुग्वेचा बचावापेक्षा या दोघांचे वेगवान प्रतिआक्रमण फ्रान्स बचावफळीचा कस पाहणार. कॅवानीच्या तंदुरुस्तीबाबत आत्ताच नेमके सांगता येत नाही. 

अन्‌ रंग ब्राझीलचा 
निझनी नोवगोरोड स्टेडियमवर फ्रान्स-उरुग्वे लढत असली तरी स्टेडियमच नव्हे, तर येथील अनेक हॉटेल ब्राझीलची ओळख असलेल्या पिवळ्या रंगात नाहून गेली आहेत. स्टेडियम शेजारील रस्त्याचे नाव बेंतांकुर आहे, त्या नावाचा खेळाडू उरुग्वे संघात आहे. यामुळे संघ लकी ठरेल अशी अपेक्षा उरुग्वे बाळगून आहेत, पण आपल्या संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलचा पिवळा रंग त्यांना सलत आहे. 


​ ​

संबंधित बातम्या