स्पर्धेची सूत्रे कतारकडे; पण संयोजन अनिश्‍चित 2022 विश्‍वकरंडक फुटबॉल

वृत्तसंस्था
Monday, 16 July 2018

चार वर्षांनी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीची सूत्रे रशियाने कतारकडे सोपवली; पण तेथील धोकादायक परिस्थितीमुळे कतारचे यजमानपद रद्द करण्यासाठी फिफावरील दडपण वाढत आहे.

मॉस्को, ता. 15 : चार वर्षांनी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीची सूत्रे रशियाने कतारकडे सोपवली; पण तेथील धोकादायक परिस्थितीमुळे कतारचे यजमानपद रद्द करण्यासाठी फिफावरील दडपण वाढत आहे.

मॉस्कोतील एका खास समारंभात रशियाने कतारकडे यजमानपद सोपवले. खंडप्राय देशातून स्पर्धा उपखंडातील एका छोट्याशा राज्यात जाणार आहे; मात्र 23 लाख लोकसंख्येचा हा देश स्पर्धा संयोजनाचे आव्हान कसे पेलणार, हा प्रश्‍न विचारला जात आहे. अद्यापही तिथे तयार नसलेली स्टेडियम तसेच वाढते तापमान संयोजन अवघड करीत आहेत; पण कतारने संयोजन यशस्वी होईल असा विश्‍वास व्यक्त केला; पण त्याचवेळी ते रशियाइतके भव्य नसेल अशी कबुलीही दिली.
कतारही आमच्याचसारखे विश्‍वकरंडकाचे उच्च दर्जाचे आयोजन करेल. त्यासाठी आम्ही आमच्या या मित्रांना मदत करण्यास तयार आहोत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. कतारचे एमीर शेख तामिम बिन हमाद अल-थानी यांनी स्पर्धा संयोजनातील सर्व प्रश्‍न दूर होतील, याची खात्री आहे; पण आमचा देश लहान आहे. त्यामुळे रशियाइतकी भव्य स्पर्धा आयोजन अवघड आहे, असे त्यांनी सांगितले.

2022ची स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर
कतार विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे व्यावसायिक लीग आणि राष्ट्रीय संघातील तणाव वाढण्याची शक्‍यता आहे. कतारमधील हवामान लक्षात घेऊन ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करण्याचे ठरले आहे; पण याच महिन्यात जगभरातील व्यावसायिक लीगचा मोसम असतो. लीग संयोजकांना आपला त्या मोसमातील कार्यक्रमात बदल करण्यासाठी निश्‍चितच पुरेसा वेळ आहे, असे फिफाने स्पष्ट केले आहे.

कतारच्या संयोजनावर युद्धाचे ढग?
लंडन ः कतारचे शेजारील देशांबरोबर बिघडत असलेले संबंध, त्यामुळे युद्धाचा तसेच दहशतवादी हल्ल्याचा निर्माण झालेला धोका यामुळे तेथील स्पर्धा संयोजन संकटात येऊ शकेल, अशी चर्चा सुरू आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त तसेच बहारीनने कतारमधील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले आहे. तसेच त्यांच्याबरोबरील व्यापार तोडला आहे. सौदीने दोन देशांच्या सीमेनजीक दोनशे मीटर कालवा खणण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीने अणू कचराही दोन देशांच्या सीमेनजीक टाकण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तणाव वाढत आहे.


​ ​

संबंधित बातम्या