'या' फुटबॉल लीगने करून दाखवले.. काय ते वाचा 

टीम ई-सकाळ
Sunday, 28 June 2020

बुंदेसलीगा फुटबॉल लीगने कोरोनाच्या काळात देखील संपूर्ण स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले आहे.

कोरोनाच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अभूतपूर्व अशी परिस्थिती क्रीडा जगतावर ओढवली होती. त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत सुरु झालेल्या जर्मनीतील बुंदेसलीगा फुटबॉल लीग, ही स्पर्धा कोरोनाच्या काळात सत्र पूर्ण करणारी यूरोपातील पहिली लीग ठरली आहे. बुंदेसलीगा फुटबॉल लीगने कोरोनाच्या काळात देखील संपूर्ण स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले आहे. काल शनिवारी बुंदेसलीगा फुटबॉल लीग मधील शेवटच्या सामन्यानंतर बोरूसिया मोंशेंग्लाबाख संघाने चॅम्पियन्स लीगसाठी २०१६ - २०१७ नंतर पात्र ठरण्याचा कारनामा केला आहे. तर फॉर्चूना डसेलडोर्फचा संघ एका अंकाने खाली घसरला आहे.    

...म्हणून विराट, रोहित अन् धोनीला अभूतपूर्व यश मिळालं : हार्दिक पांड्या        

बोरूसिया मोंशेंग्लाबाख संघाने हर्था बर्लिनचा २ - १ ने पराभव केला होता. त्यामुळे मोंशेंग्लाबाख संघाने बायर्न लीवरकुसेनच्या पुढे चौथे स्थान मिळवले होते. तर डसेलडोर्फचा यूनियन बर्लिनने ३ - ० असा दारुण पराभव केला होता.       

यापूर्वी बायर्न म्यूनिख संघाने दोन सामन्यांपूर्वी सलग आठवे जेतेपद निश्चित केले होते, तर बोरसिया डार्टमंड हा संघ दुसर्‍या स्थानावर होता. बायर्न म्यूनिखने  वुल्फ्सबर्गला ४ - ० ने पराभूत केले. तर डार्टमंड संघाला होफेनहेम संघाकडून ० - ४ ने पराभव स्वीकारावा लागला होता.  

जर्मनीतील बुंदेसलीगा फुटबॉल लीगच्या २०१९ - २० मधील सत्रासाठी बायर्न म्यूनिख संघातील स्ट्राइकर खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्कीला सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. रॉबर्ट लेवांडोवस्कीने स्पर्धेच्या सुरवातीपासूनच चांगले प्रदर्शन करत सर्वाधिक ३३ गोल केले आहेत. ऑगस्ट महिन्यातील  'प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून देखील रॉबर्ट लेवांडोवस्कीची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान, रॉबर्ट लेवांडोवस्कीने सलग ११ सामन्यांमध्ये गोल करत इतिहास रचला आहे. त्यामुळे रॉबर्ट लेवांडोवस्कीच्या दमदार कामगिरीमुळे बायर्न म्यूनिखने सलग आठव्यांदा बुंदेसलीगा स्पर्धेचा खिताब जिंकला आहे.

कोरोनामुळे आता टेनिस जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित   

दरम्यान, जर्मनीमध्ये आत्तापर्यंत १ लाख ९४ हजार ४९८ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर ८ हजार ९६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.                
 

 


​ ​

संबंधित बातम्या