इंग्लंडमध्ये चर्चा फक्त फुटबॉल उपांत्य सामन्याची

सुनंदन लेले
Tuesday, 10 July 2018

लंडनला विंम्बल्डन चालू आहे. नॉटींगहॅमला भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. पण तुम्हांला खरं सांगतो चर्चा फक्त बुधवारी होणार्‍या फुटबॉल विश्वकरंडकतील इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया या उपांत्य सामन्याची रंगत आहे. 

नॉटींगहॅम : लंडनला विंम्बल्डन चालू आहे. नॉटींगहॅमला भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. पण तुम्हांला खरं सांगतो चर्चा फक्त बुधवारी होणार्‍या फुटबॉल विश्वकरंडकतील इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया या उपांत्य सामन्याची रंगत आहे. 

इंग्लंडमध्ये फुटबॉलच्या खेळाला लोकांच्या मनात अव्वल स्थान आहे. शाळकरी मुलांच्यात सर्वात जास्त आस्था फुटबॉलबद्दल आहे. क्रिकेट टेनिससारखे खेळ वर्षातील 5 महिने खेळले जातात मात्र फुटबॉल अगदी वर्षभर खेळला जातो. इंग्लिश प्रिमियर लीग सामन्यात मैदाने प्रेक्षकांनी खचाखच भरतात आणि टीव्हीवरचे दर्शक इतर खेळांपेक्षा याच स्पर्धेला जास्त असतात. त्यातून यंदा इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत अफलातून खेळ करत आहे ज्याने लोकांच्या फुटबॉल प्रेमाला अगदी भरती आली आहे. 

‘‘ का नाही भरते येणार आमच्या फुटबॉल प्रेमाला... इंग्लंडचा संघ खरोखर मस्त खेळ करतोय, बर्‍याच मोठ्या कालावधीनंतर आम्ही उपांत्य सामना खेळणार आहोत. खूप मजा येणार आहे बुधवारच्या सामन्याला’’, आम्ही राहत असलेल्या नॉटींहॅमच्या घराची मालकीण कॅमिला म्हणाली. 

‘‘1990 साली इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य सामना खेळला होता. पराभव झाल्याने आमचा लाडका खेळाडू पॉल गॅस्कॉइन सामना संपल्यावर ढसाढसा रडला होता. आणि हो, त्यावेळी क्रोएशियाला स्वातंत्र्यही मिळाले नव्हते. पण कबूल करावे लागेल की क्रोएशियाचा संघ मस्त खेळ करतो आहे. त्यांच्या संघात लुका मोड्रीक आणि इव्हान रॅकीटीक सारखे भन्नाट खेळाडू असूनही संघ फक्त त्या दोघांवर विसंबून नाही. या सगळ्याचा विचार करता बुधवारचा सामना रंगतदार होणार यात कोणालाच शंका नाही’’, नॉटींगहॅम फुटबॉल क्लबचा एक खेळाडू गॅरथ उत्साहाने सांगत होता.

स्थानिक लोकांचा प्रशिक्षक गॅरथ साऊथगेट यांच्यावरचा विश्वास वाढत चालला आहे. साऊथगेट यांनी तमाम प्रतिष्ठित नावांना बगल देऊन नव्या तरुण संघाची बांधणी केली, ज्यांनी कमाल कामगिरी करून दाखवली आहे. 28 वर्षांनंतर इंग्लंडचा वर्ल्डकप संघ उपांत्य सामना खेळणार आहे.

नॉटींगहॅमला भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघ येऊन पोहोचले आहेत. बुधवारी दोन्ही संघ दुपारी सराव करून नंतर टीव्ही स्क्रीनला चिकटणार आणि उपांत्य सामन्याचा आनंद घेणार आहेत. नॉटींगहॅमचे बरेचसे स्पोर्टस् बार संध्याकाळी एकदम भरून जाणार कारण इथे घरात बसून नव्हे तर स्पोर्टस् बार मधे जाऊन एकत्र धमाल करत फुटबॉल सामन्याचा आनंद घेण्याची जुनी परंपरा आहे. आम्ही सुद्धा संध्याकाळी त्याच प्रकारे फुटबॉल सामन्याचा आनंद घेणार आहोत.


​ ​

संबंधित बातम्या