बंगाल वॉरियर्सने हरियानाला रोखले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

-बंगाल वॉरियर्सने 17 सामन्यांत दहा विजयासह 63 गुण मिळवून आपले दुसरे स्थान कायम राखले.

-पराभवानंतरही 16 सामन्यांत दहाच विजयासह 54 गुण मिळविणाऱ्या हरियाना स्टिलर्सचेही तिसरे स्थान कायम

-मनिंदरसिंग, के. प्रभंजन आणि महंमद नबीबक्ष या चढाईपटूंच्या जोरदार खेळाने बंगालने विश्रांतीलाच 30-14 अशी आघाडी मिळवून सामन्याचा निकाल स्पष्ट केला

-हरियानाकडून चढाईत विनयने 14, तर विकास कंडोलाने 9 गुणांची कमाई केली. त्याचवेळी बंगालच्या मनिंदरने 19 चढाईतच 18 गुण मिळवताना जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले.

पुणे - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात पुणे टप्प्यात गुरुवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्सने आक्रमणात चमकदार कामगिरी करत हरियाना स्टिलर्सची घोडदौड 48-36 अशी रोखली. या विजयानंतर बंगालने 17 सामन्यांत दहा विजयासह 63 गुण मिळवून आपले दुसरे स्थान कायम राखले. पराभवानंतरही 16 सामन्यांत दहाच विजयासह 54 गुण मिळविणाऱ्या हरियाना स्टिलर्सचेही तिसरे स्थान कायम राहिले. 
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात आक्रमणात दोन्ही संघांची ताकद सारखी होती; पण बचावात हरियाना मागे राहिले आणि त्याचा फटका त्यांना बसला. तीन लोण बसल्यामुळे ते कायम मागेच राहिले आणि त्यांना आक्रमकांच्या प्रयत्नांनतरही पराभवाचा सामना करावा लागला. 
मनिंदरसिंग, के. प्रभंजन आणि महंमद नबीबक्ष या चढाईपटूंच्या जोरदार खेळाने बंगालने विश्रांतीलाच 30-14 अशी आघाडी मिळवून सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. मात्र, उत्तरार्धात फारसा धोका न पत्करता खेळणाऱ्या बंगालला आपली गुणसंख्या अधिक वाढवता आली नाही. पूर्वार्धात इतकाच वेगवान झालेल्या उत्तरार्धात एकूण 40 गुणांची नोंद झाली. यात बंगालला 18 गुण मिळविता आले, तर हरियानाने 22 गुणांची कमाई करत सामन्यात चुरस आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना बंगालच्या बलदेवसिंग, रिंकू आणि जीवाकुमार यांच्या बचावाला आव्हान देण्यात अपयश आले. 
हरियानाकडून चढाईत विनयने 14, तर विकास कंडोलाने 9 गुणांची कमाई केली. त्याचवेळी बंगालच्या मनिंदरने 19 चढाईतच 18 गुण मिळवताना जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. बंगालच्या बलदेवसिंगने "हाय फाइव्ह' करताना आपली छाप पाडली. हरियानाकडून विकास काळेने बचावात तीन गुणांची कमाई केली. त्यांनी कर्णधार धर्मराज चेर्लाथनला विश्रांती दिली; पण त्याची उणीव त्यांना भासली.


​ ​

संबंधित बातम्या