धोनी आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये मारामारी ; त्यावर सेहवाग म्हणतो...  

टीम ई-सकाळ
Sunday, 23 August 2020

आयपीएलच्या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे अनेक चाहते आहेत. कोणी महेंद्रसिंग धोनीमुळे सीएसकेचा फॅन आहे. तर कोणी विराट कोहलीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहता आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आतंरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला आहे. त्यामुळे यापुढे धोनी आता भारतीय क्रिकेट संघाच्या 'ब्लू जर्सी' मध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र तो इंडियन प्रीमिअर लीगच्या फ्रँचायझी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचे नेतृत्व करणार आहे. आणि बहुचर्चित  आयपीएल स्पर्धेचा यंदाचा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत पुढील महिन्यापासून सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट संघातील आणि जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू आयपीएलच्या या स्पर्धेत प्रतिस्पर्धी म्हणून मैदानावर उतरतात. व त्यांच्यातील टक्कर पाहण्यासाठी क्रिकेट चाहते या स्पर्धेची आवर्जून वाट पाहत असतात. यामुळे या स्पर्धेचा रंग क्रिकेट चाहत्यांमध्ये आत्तापासूनच चढू लागला आहे.     

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

आयपीएलच्या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे अनेक चाहते आहेत. कोणी महेंद्रसिंग धोनीमुळे सीएसकेचा फॅन आहे. तर कोणी विराट कोहलीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहता आहे. अशातच मागील दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर मधील कुरुंदवाड येथे सीएसकेचा कर्णधार एम एस धोनी व मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले होते. त्यानंतर या वादाची दखल भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने घेतली आहे. वीरेंद्र सेहवागने या घटनेसंदर्भात सोशल मीडियावरून ट्विट केले असून, या मध्ये त्याने वेड्यांनो हे काय करत आहात, असे म्हटले आहे. तसेच सर्व खेळाडू एकमेकांबद्दल प्रेम भावना ठेवतात किंवा जास्त बोलत नसल्याचे सेहवागने सांगितले. याशिवाय खेळाडू आपल्या कामाशी काम ठेवतात, मात्र काही फॅन्स वेगळ्याच तऱ्हेचे वेडे असल्याचे सांगत, सेहवागने मारामारी करू नका व भारतीय खेळाडूंना देशाचा एक संघ म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन ठेवण्यास सांगितले आहे. 

स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी धोनीने आपल्या आवडत्या गाण्यासोबत सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. धोनीच्या या निर्णयाचा क्रिकेट जगतासह सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. तर काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिडा मंत्रालयाने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाचा समजला जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची निवड केली आहे. यापूर्वी 1998 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, 2008 मध्ये आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि 2018 मध्ये विराट कोहली यांना खेलरत्नने गौरविण्यात आले आहे.   

दरम्यान, प्रत्यक्षात असा प्रकारच घडला नसल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही खेळाडूंची उभारण्यात आलेली होर्डिंग्ज पालिकेला सांगून काढण्यात आली असल्याची माहिती कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे यांनी दिली आहे. तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनीदेखील असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे.

 

        


​ ​

संबंधित बातम्या