पाचवा कसोटी सामना विराट सेनेचा शेवटचा प्रयत्न

सुनंदन लेले
Thursday, 6 September 2018

कसोटी मालिका गमावून बसलेल्या विराट कोहलीच्या संघाला गुणवत्ता सिद्ध करायची शेवटची संधी  पाचवा कसोटी सामना देणार आहे. ओव्हल मैदानावर होणार्‍या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाज आपल्या गोलंदाजांना साथ देतात का नाही ही उत्सुकता आहे. इंग्लंड संघाचा आधारस्तंभ अ‍ॅलिस्टर कुकचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याने यजमान संघ आपल्या लाडक्या खेळाडूला विजयी निरोप द्यायचा प्रयत्न करणार आहे. 

मालिकेची सुरुवात होताना लक्ष विराट कोहलीवर होते. गेल्या दौर्‍यात विराटला इंग्लंडमधील कसोटी सामन्यात मोठे अपयश आले होते. विराट कोहली इंग्लंडमधे धावा करू शकतो का नाही या प्रश्नाचे उत्तर विराटच्या बॅटच्या तडाख्याने दिले आहे. दोन्ही संघातील फलंदाज स्विंग गोलंदाजीसमोर ततपप करत असताना विराटने जवळपास प्रत्येक सामन्यातील प्रत्येक डावात फलंदाजीचा ठसा उमटवला आहे. साहजिकच इंग्लंडमधील पत्रकारांनी विराटची स्तुती करणे थांबवले असून टीकेचा भडिमार बाकी भारतीय फलंदाजांच्या अपयशाकडे रोखला आहे. भारतीय फलंदाजांना टिका निमूटपणे ऐकून घ्यावी लागत आहे कारण 4 कसोटी सामन्यात विराटचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांनी सातत्य दाखवलेले नाही.

पाचव्या सामन्याकरता इंग्लंडच्या संघात परत बदल होणार आहेत. आदिल रशिदच्या जागी ख्रिस वोक्स संघात परत येणार आहे. अ‍ॅलिस्टर कुकने कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात संस्मरणीय खेळी करून दाखवायची इच्छा प्रदर्शित केली आहे. भारतीय संघात मांडीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्याच्या जागी हनुमा विहारीला संधी मिळायची शक्यता नाकारता येत नाही. 

बाकी मैदानांच्या तुलनेत ओव्हलची खेळपट्टी फलंदाजांना जरा जास्त साथ देते. लंडनमधील गरम हवेनेही खेळपट्टी कोरडी व्हायला मदत झाली आहे. पहिल्या चार कसोटी सामन्यांनी निकाल दिल्याने मालिका रंगली. यजमान संघाने मालिका जिंकलेली असली तरी लंडनच्या क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांनी पाचव्या सामन्याला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे समजले. इतकेच काय काही मराठी क्रिकेट रसिक अमेरिकेतून पाचव्या कसोटी सामन्याचा आनंद घ्यायला सुट्टी काढून ओव्हल मैदानावर हजर राहणार असल्याचे समजले. 

​ ​

संबंधित बातम्या