भाड्याच्या घरात राहून हार्दिक-कृणालच्या यशाची स्क्रिप्ट लिहणारा 'बाप-माणूस'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 16 January 2021

आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील हिमांशू यांनी आपल्या दोन्ही मुलांना किरण मोरे यांच्या अकादमीत दाखल केले.

हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचे वडील हिमांशू पांड्या हे 1993 च्या दरम्यान फायनान्स क्षेत्रात काम करत होते. गुजरातच्या सुरतमधून काही कारणास्तव हिमांशू यांना बडोद्याला यावे लागले. हिमांशू यांना क्रिकेटची खूप आवड होती. भाड्याच्या घरात राहुन ते आपल्या दोन मुलांना क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न पाहत होते. दोघांनी क्रिकेटमध्ये करियर करावे ही त्यांची इच्छा होती. ते आपल्या दोन्ही मुलांसोबत मॅच पाहायचे आणि बऱ्याचदा त्यांना प्रत्यक्षात सामना पाहता यावा म्हणून स्टेडियममध्येही घेऊन जायचे. 

आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील हिमांशू यांनी आपल्या दोन्ही मुलांना किरण मोरे यांच्या अकादमीत दाखल केले.  कृणाल पांड्या 7 वर्षाचा आणि हार्दिक पांड्या 5 वर्षांचा असताना हिमांशू या दोघांना घेऊन किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीत गेले होते. मोरे यांनी सुरुवातीला या दोघांना प्रवेश देण्यास नकार दिला होता. यावेळी हिमांशू यांनी क्षमता पाहा आणि मग निर्णय घ्या, असे सांगत किरण मोरेंना मनवले. दोघांच्यातील टॅलेंड पाहून किरण मोरेंनी दोघांना प्रवेश तर दिलाच याशिवाय पहिले 3 वर्षे त्यांच्याकडून कोणतीही फी घेतली नाही. खुद्द किरण मोरे यांनी एका मुलाखतीमध्ये या गोष्टी सांगितल्या होत्या. किरण मोरेंच्या अकादमीत 12 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांनाच प्रशिक्षित केले जायचे. पण या दोघांच्यातील क्षमता पाहिल्यानंतर आपल्या अकादमीतला नियमही त्यांनी बदलला होता.   

पांड्या बंधूंना पितृशोक; कृणालचा स्पर्धा सोडून घरी परतण्याचा निर्णय

पांड्या बंधुच्या यशात त्यांच्या वडिलांचे योगदान खूप मोठे आहे. मुलांना क्रिकेट ट्रेनिंगमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी सूरतहून बांद्राला येण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलमध्ये सिलेक्ट होण्यापूर्वी पांड्या बंधूंची आर्थिक परिस्थिती नाजूकच होती. दोघांनी कार खरेदी केली पण त्यात पेट्रोल टाकायलाही त्यांच्याकडे कधी-कधी पैसे नसायचे. पण आयपीएलमध्ये झळकल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्याने आपल्या वडिलांना कार गिफ्ट दिली होती.  या क्षणी त्याचे वडील भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. गाडीच्या शोरुममधून त्यांनी 'आय लव्ह यू' या शब्दांत लेकावरील प्रेम व्यक्त केले होते. 2020 मध्ये हार्दिक पांड्याने नताशासोबत विवाह केला. त्याने तिच्यासोबत साखरपूडा केल्याची त्यांना खबरही नव्हती. ही गोष्टही त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती.  


​ ​

संबंधित बातम्या