ती 49 मिनिटे.. 29 चेंडू अन् 10 धावांच्या नाबाद खेळीनंतर 'विनोद' रडला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

तगड्या बॅटिंग लाईनअपच्या जोरावर भारत विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचून नवा पराक्रम रचणार असे वाटत असताना डाव क्षणात कोलमडला. अवघ्या 22 धावांत भारताने 7 विकेट गमावल्या. 

Vinod kambli Birthday : सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानातील कर्णधार विराट कोहलीपासून ते हार्दिक पांड्यापर्यंत अनेकजण हटके लूकनं चर्चेत असतात. ही क्रेझ काही आजकालची नव्हे. नव्वदीच्या दशकातही काही मोजके खेळाडू मैदानातील खेळीशिवाय मैदानाबाहेरच्या आपल्या अँटिक अंदाजाने चर्चेत असायचे. त्यातीलच एक नाव म्हणजे बॅटमध्ये धमक असूनही चमकायचं राहून गेलेला विक्रमादित्याचा पार्टनर विनोद कांबळी.

त्याचा न्यारा तोरा आणि सचिनचा स्वभाव एकदम टोकाचा असून ही ते जिवलग मित्र  झाले. दोन टाकाच्या आणि स्वभावाला एकत्र आणलं ते क्रिकेटनं आणि त्यांचे गुरु आचरेकर सरांनी. दोघांच्यात आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार आणि विक्रमी पार्टनरशिप पाहण्याचा योग लाभला नसला तरी मैदानाबाहेरील त्यांची  पार्टनरशिप आजही अबाधित आहे. सचिन-कांबळी यांच्यातील मैत्रीच्या नात्यात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निश्चितच निर्माण झाले. पण आरोप-प्रत्यारोप आणि त्यांच्यात निर्माण झालेला नात्यातील दुरावा हा मैदानातील दोन खेळाडूंतील ताळमेळ ढासळावा आणि रन आउटच्या स्वरुपात विकेट पडावी असाच होता. चूक कोणाची- कोणी काय कॉल द्यायला पाहिजे होता या चर्चा रंगल्या.  हे सगळं घडत असताना कोणीतरी रिव्ह्यू  घेतला अन् सर्वकाही ठिक झालं. मैत्री नॉट आउट असल्याचे चित्र आपल्यासमोर उभे राहिले . मैत्री टिकण्यासाठी रिव्ह्यू घेणारा कोण? हे कधी बाहेर येवो न येवो पण हे चित्र असेच कायम राहो हिच क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.

क्रिकेटवर बोलताना सचिनशिवाय पुढे जाता येत नाही. अगदी तशीच काहीशी परिस्थिती विनोद कांबळीवर बोलताना सचिनबाबत होते, विनोद कांबळीच्या स्ट्राँकमध्ये जो रिदम होता तो सचिनपेक्षाही भारी होता. याचाच अर्थ त्याने जर सचिनसारखा गेमवर फोकस केला असता तर कांबळीही खूप मोठा झाला असता. पण काहीतरी 'अनर्थ' झाला. क्रिकेटच्या मैदानात अपयशी ठरल्यानंतर काही काळ विनोद कांबळीने चित्रपटसृष्टी आणि राजकारणातही बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. पण तिथही त्याला हिटचा शिक्का काही बसला नाही.  बर्थडे दिवशी त्याच्या खोड्या सांगण्यात काही अर्थ नाही.  क्रिकेटच्या मैदानातील त्याची सचिनसोबतची शालेय वयात केलेली भागीदारी थोडी बाजूला ठेवली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एखादा प्रसंग आठवायचे झाले तर  1996 च्या विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना हा अविस्मरणीय असाच होता. कदाचित कांबळीही तो क्षण कधीच विसरणार नाही. 

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात 13 एप्रिल 1996 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सेमीफायनल रंगली होती. भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा होती ती मोहम्मद अझरुद्दीनकडे. नाणेफेक जिंकून मोहम्मद अझरुद्दीनने गोलंदाजी स्वीकारली आणि इथचं आपली रणनिती फसली. अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील लंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 251 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सचिनने अर्धशतकी खेळी करुन चांगली सुरुवात करुन दिली. सचिनने या सामन्यात 65 धावांची खेळी केली होती. 1 बाद 98 अशी धावसंख्या भारताच्या धावफलकावर होती. तगड्या बॅटिंग लाईनअपच्या जोरावर भारत विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचून नवा पराक्रम रचणार असे वाटत असताना डाव क्षणात कोलमडला. अवघ्या 22 धावांत भारताने 7 विकेट गमावल्या.

कर्णधार अझरुद्दीन आणि  त्याकाळातील स्टार बॅट्समन अजय जडेजा या दोघांना खातेही उघडता आले नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विनोद कांबळी त्या सामन्यात 49 मिनिटात 29 चेंडू खेळला आणि 10 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या बाजूनं विकेट पडत होत्या. भारताच्या धावफलकावर 34.1 षटकात 8 बाद 120 धावा बघून मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाळपोळ सुरु केली. अझरुद्दीन प्रेक्षकांना मनवायला ड्रेसिंगरुमधून मैदानात उतल्याचं आजही अनेक चाहत्यांच्य लक्षात असेल. विनोद हा हसवणारा असतो. पण क्रिकेटचा विनोद झाल्यावर कांबळी ढसाढसा रडताना पाहायला मिळाले होते. प्रेक्षकांच्या राड्यानंतर या सामन्यात श्रीलंकेला विजेता घोषीत करण्यात आले होते. याच श्रीलंकने त्यावर्षी वर्ल्ड कप जिंकला होता. या सामन्यानंतर कांबळीने 30 हून अधिक वनडे सामने खेळले. पण तो वर्ल्ड कप, ती 49 मिनटे.. 29 चेंडू आणि 10 धावांची नाबाद खेळी कांबळी कदाचित कधीच विसरणार नाही. 


​ ​

संबंधित बातम्या