बाजीगर महंमद सिराज! किती विकेट घेतल्या एवढ्यावर त्याची महती संपत नाही, तर...

शैलेश नागवेकर
Sunday, 24 January 2021

‘तीन सामन्यांपूर्वी तो संघातला ‘मुलगा’ होता; परंतु चौथ्या सामन्यात तो संघातला ‘बाप-खेळाडू’ झाला,’ महंमद सिराजबाबत वीरेंद्र सेहवागनं काढलेले हे गौरवोद्गार केवळ सिराजबाबतच नव्हे, तर भारतीय संघाची दुसरी फळी किती भक्कम आहे हे सिद्ध करणारे आहेत. 

भारतानं ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयासह नवा इतिहास घडवला. त्या कर्तृत्वाचे शिलेदार सर्वच खेळाडू आहेत. प्रत्येकाचं योगदान तेवढंच बहुमूल्य आहे; पण सिराजची कामगिरी अनन्यसाधारण. त्यानं किती विकेट घेतल्या एवढ्यावर त्याची महती संपत नाही, तर त्यानं केलेला प्रवास थक्क करणारा आहे. यशाचा मुकुट अभिमानानं मिरवायचा असेल तर अनेक अडथळे पार करावे लागतात; पण सिराजच्या या वाटेत अडथळ्यांशिवाय काहीच नव्हतं असं म्हणणं रास्त ठरेल. तरीही त्यानं केलेला प्रवास आणि भारतीय संघासाठी केलेली शर्थ पाहता त्याला सलाम करायला हवा.

हैदराबादमध्ये अतिशय सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. त्याचे वडील महंमद घौस हे रिक्षाचालक. घरचा गाडा चालवत असताना त्यांनी मुलाचं क्रिकेटप्रेमही जपलं. प्रसंगी खिशाला कात्री लावली; पण मुलाला क्रिकेटसाठी काहीच कमी पडू दिलं नाही. मुलगाही वडिलांचा हा त्याग पाहत होता. आपल्या या मुलानं देशासाठी खेळावं हे तर त्याच्या वडिलांचं स्वप्न होतंच; पण सिराज ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यावर असतानाच वडिलांचं निधन झालं. सिराजनं म्हटलं असतं तर, तो मायदेशी परतू शकला असता; पण देशासाठी खेळण्याचं वडिलांचं स्वप्न अपूर्णच राहिलं असतं. दुःख पचवून तो संघाबरोबर राहिला...खेळला...आणि संघाचा तारणहारही ठरला. जसप्रीत बुमरा, महंमद शमी, उमेश यादव असे प्रमुख वेगवान गोलदांज जायबंदी झाल्यावर अवघ्या तिसऱ्या सामन्यांतच सिराज हा भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज झाला. कोवळ्या वयात कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी आणि समर्थपणे पेलून दाखवावी अशी जबाबदारी सिराजनं संघाबाबत पार पाडली. 

IPL 2021 : ...म्हणून मुंबई इंडियन्सने मलिंगाला रिलीज केलं

सिडनीत कसोटीचा सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या राष्ट्रगीताच्या वेळी सिराजच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहता, हा खेळाडू वेगवान अशी आक्रमक गोलंदाजी करत असला तरी तो किती भावुक आहे, हे दर्शवणारे आहेत. विराट कोहलीसारखा आक्रमक आणि अजिंक्‍य रहाणेसारखा संयमी अशी दोन टोकं असलेले कर्णधार ज्या भारतीय संघात आहेत तिथं सिराजसारखे असे खेळाडू असणं हेही स्वाभाविकच. 

‘‘राष्ट्रगीत सुरू असताना मला वडिलांची आठवण येत होती, म्हणून माझे डोळे पाणावले,’’ असं सांगणारा सिराज नवाकोरा चेंडू हाती आल्यावर तेजतर्रार माराही करत होता, म्हणूनच नव्या पिढीचे आणि नव्या मानसिकतेचे खेळाडू असलेल्या या संघाला ‘टीम इंडिया’ असं म्हटलं जातं. ही ‘टीम इंडिया’ कधीच हार मानत नाही. भले कितीही संकटं आली तरी सिराजसारखे खेळाडू जिगर दाखवतात आणि सन्मानही जपतात.

सिडनी आणि ब्रिस्बेनमधल्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून सिराजला उद्देशून वांशिक शेरेबाजी केली गेली. वाईट शब्द वापरण्यात आले. एखादा तापट स्वभावाचा खेळाडू असता तर त्यान तिथल्या तिथंच प्रत्युत्तर दिलं असतं; पण आपण केवळ क्रिकेटखेळाडूच नसून, देशाचे समंजस नागरिक आहोत आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहोत, याची जाणीव ठेवून सिराज लढत राहिला व त्यानं आपली चौकट कुठंही मोडली नाही. जेव्हा एखाद्या खेळाडूचा आदर्श ठेवला जातो तेव्हा तो केवळ गुणवत्तेचा आणि क्षमतेचा नसतो, तर तो वर्तणुकीचाही असतो.

"...तर विराटला सर्वच प्रकारातील नेतृत्व सोडावे लागेल"

ऑस्ट्रेलियातली कसोटीमालिका सुरू होण्याअगोदर झालेल्या एका सरावसामन्यात सिराज नॉनस्ट्रायकर उभा होता. समोरचा फलंदाज जसप्रीत बुमरा यानं मारलेला चेंडू गोलंदाजी करणाऱ्या कॅमेरून ग्रीनच्या डोक्‍याला जोरात लागला. वास्तविक, बुमरा त्या वेळी धाव घेण्याचा विचार करत होता; पण सिराजनं हातातली बॅट तिथंच टाकली आणि तो कॅमेरून ग्रीनला सावरण्यासाठी गेला. नियमानुसार तो धावचीत होऊ शकला असता; पण त्या वेळी त्यानं स्वतःच्या विकेटची काळजी न करता एका खेळाडूला - मग तो प्रतिस्पर्धी संघातला का असेना - दुखापत झालेली पाहून त्याला सावरण्याचं कर्तव्य प्राधान्याचं मानलं. या प्रसंगानंतर ऑस्ट्रेलियात सिराजचं फार कौतुक झालं, तरीही काही नतद्रष्ट प्रेक्षक याच सिराजविरुद्ध वांशिक शेरेबाजी करत राहिले. क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ असं म्हटलं जायचं. आता ही व्याख्या कधी कधी बदलली जाण्याचे प्रसंग उद्भवतात; पण सिराजसारखे खेळाडू ही सद्भावना आजही जपून आहेत. ब्रिस्बेन इथल्या ऐतिहासिक चौथ्या कसोटीत त्यानं दुसऱ्या डावात पाच विकेट मिळवल्या आणि आपल्या देशातल्या महान गोलंदाजांच्या पंक्तीत बसण्याचा मान पटकावला. आता जसप्रीत बुमरा, महंमद शमी, ईशान्त शर्मा, उमेश यादव यांच्या पंक्तीत दाखल झालेला सिराज हा एक भावनिक आणि सभ्य खेळाडू आहे. भारतीय संघ केवळ मैदानावरच घडत आहे असं नाही, तर मैदानाबाहेरही तो महान आहे आणि महंमद सिराज हे याचं प्रातिनिधिक उदाहण आहे.

शैलेश नागवेकर

saptrang@esakal.com


​ ​

संबंधित बातम्या