ISSF World Cup : ऑलिम्पिंकसाठी तेजस्विनीला मिळाला 'सोनेरी' बूस्ट

सुशांत जाधव
Friday, 26 March 2021

उणीव अल्पकालावधीत भरुन काढत टीम इव्हेंटमध्ये तिने  देशासाठी सुवर्णमय कामगिरी करुन दाखवली. 

ऑलिम्पिंकचा प्रवास सुवर्णमयी करण्याच्या  दिशेने भारतीय नेमबाजांनी दिल्लीत सुरु असलेल्या शूटिंग वर्ल्डकपमध्ये (ISSF WORLD CUP) पाउल टाकले. शूटींग वर्ल्डकप पदकतालिकेत भारताचे अव्वलस्थान देशातील नेमबाजांचा निशाणा लक्षवेधी असल्याची अनुभूती देणारा आहे. कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत हिच्याकडूनही या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा होती. वैयक्तिक इवेंटमध्ये तिला मनासारखी कामगिरी करता आली नाही. पण याची उणीव अल्पकालावधीत भरुन काढत टीम इव्हेंटमध्ये तिने  देशासाठी सुवर्णमय कामगिरी करुन दाखवली. 

भारताला अकरावे सुवर्ण मिळवून देण्यात तेजस्विनीने उचलला मोलाचा वाटा
 
50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील महिलांच्या वैयक्तिक इवेंटमध्ये बाराव्या स्थानावर राहिलेलेल्या तेजस्विनीने अवघ्या काही तांसात चुकांमध्ये सुधारणा करुन टीम इवेंटमध्ये देशाला गोल्ड मिळवून दिले. तेजस्विनी सांवतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मिक्सड प्रकारात संजीव राजपूतच्या साथीनं सुवर्ण कामगिरी नोंदवली. या जोडीने भारताला अकरावे सुवर्ण पदक मिळवून दिले. तिची ही कामगिरी प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानास्पद अशीच आहे. 

गोल्डन कामगिरीनंतर काय म्हणाली तेजस्विनी

शूटींग वर्ल्डकपमधील सुवर्ण यशाबद्दल तेजस्विनी सावंत म्हणाली की, ऑलिम्पिंकमध्ये खेळणार असल्यामुळे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI)  आणि  राष्ट्रीय रायफल्स असोसिएशन (NRA) यांनी आमच्यासाठी ऑक्टोबरपासूनच कॅम्प लावले होते. ट्रायल उत्तम झाल्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून आशा होती. वैयक्तिक इवेंटमध्ये 'मार्क टू मार्क'  कामगिरी करण्यात कुठेतरी कमी पडले. केवळ 2 पॉइंट्स कमी मिळवल्यामुळे 12 व्या स्थानावर राहिले. फायनलची संधी हुकली. पण काय चुका झाल्या. कुठे कमी पडलो याचा विचार करुन पुढच्या इवेंट्सची तयारी केली.

ऑलिम्पिंक स्पर्धेसाठी मिळाला बूस्ट  

वैयक्तिक इवेंटमधील मॅचनंतर स्वत:च्या कामगिरीची चाचपणी केली. कुठे कमी पडलो?  ते भरुन काढण्यासाठी काय करावे लागेल? या प्रश्नांची प्रशिक्षकांसोबत चर्चा करुन कमी वेळात उत्तरे शोधून  पुढच्या मॅचसाठी तयार झालो. खूपच कमी वेळात कमकुवत बाजू शोधून कामगिरी उंचावण्यात आम्हाला यश आले ही सकारात्मक गोष्ट आहे, असे सांगायलाही तेजस्विनी विसरली नाही. प्रत्येक अ‍ॅथलेट देशासाठी पदक जिंकण्याच्या इराद्याने मॅच खेळत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी प्रत्येक पदक हे महत्त्वाचे असते. वर्ल्डकपमधील सुवर्ण कामगिरी आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टिने माझ्यासाठी बूस्ट देणारी ठरेल, असेही तेजस्विनी सावंतने म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या