जिद्द आणि प्रगती! ब्रेन स्ट्रोकच्या धक्क्यानंतर 9 महिन्यांत भारतीय संघात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 March 2021

 दिल्लीतील सोळा वर्षांच्या तिरंदाज प्रगतीची प्रखर जिद्दीला यश
 

मुंबई : प्रखर जिद्द असल्यावर कितीही अडचणींवर मात करता येते, हेच 16 वर्षीय तिरंदाज प्रगती चौधरीने दाखवून दिले आहे. पाच मे रोजी ती ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी पडली. आता पाच मार्च रोजी प्रगती आणि तिचे कुटुंबीय भारतीय संघातील निवडीचा आनंद साजरा करीत आहेत. 

नऊ महिन्यांपूर्वी डॉक्‍टर तसेच तिच्या कुटुंबीयांनी प्रगती पुन्हा तिरंदाजी करू शकेल ही आशाच सोडली होती, पण खेलो इंडियामुळे प्रकाशात आलेल्या, कॅडेट गटात अनेक स्पर्धा जिंकलेल्या प्रगतीने सोनीपत येथील निवड चाचणीत तिसरा क्रमांक मिळून विश्‍वकरंडक तिरंदाजीसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. 

मे महिन्याच्या सुरुवातीस अचानक ब्रेन हॅमरेज झाले. सखोल चाचणीत ब्रेन स्ट्रोक झाल्याचे लक्षात आले. तातडीने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही आठवड्यांनी तिला चालण्याची परवानगी देण्यात आली. ऑपरेशननंतर दोन महिन्यांनी डॉक्‍टरांनी सरावास परवानगी दिली.सुरुवातीस सराव करतानाही खूप त्रास होत होता, पण मी जिद्द हरले नाही. प्रतिकूल परिस्थितीत वडील शांत होते. त्यांनीही प्रोत्साहित केले, असे तिने सांगितले.

स्टेशनरी दुकान भाड्याने देऊन उपचार 
 

प्रगतीच्या भारतीय संघातील पुनरागमनात तिच्या वडिलांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांनी मुलीवरील उपचारासाठी आपले स्टेशनरीचे दुकान भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. अर्थात ते क्रीडा मंत्रालय तसेच अनेकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून केलेल्या मदतीचा उल्लेख करतात. आपल्या मुलीला आपली गरज लागेल, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

ऑपरेशननंतर डावा पाय काहीही साथ देत नव्हता. अनेकांनी मला मदत केली. या सर्व वाटचालीत धनुष्य पुन्हा जेव्हा पेलले, तो क्षण विसरणार नाही. जणू काही नव्याने सराव सुरू केला. त्यावेळी लक्ष्यवेध होताना झालेला आनंदही मोलाचा होता. भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतरच्या भावना शब्दांत व्यक्त करणेच अवघड आहे. 
- प्रगती चौधरी, तिरंदाज.
 


​ ​

संबंधित बातम्या