सूर्याला 'टशन' देताना 'टेन्शन'मुळं विराट नियम विसरला!

सुशांत जाधव
Thursday, 29 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेंडूला लाळ लावणे किंवा घाम लावण्यावर बंधन आहे. तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार चेंडूला घाम लावताना पाहायला मिळाले. टेन्शनमध्ये असल्यामुळे त्याला नियमाचा विसर पडला का?

सूर्यकुमार यादवच्या दमदार 79 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 5 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पराभूत करत मुंबई इंडियन्सनं प्ले ऑफमध्ये आपल स्थान निश्चित केलं. प्ले ऑफमध्ये जाणारी मुंबई इंडियन्स ही पहिली टीम ठरली आहे. सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात 'टशन' पाहायला मिळाली. डोकेदुखी ठरत असलेल्या सूर्यकुमारवर दडपण टाकण्याचा बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीनं एक डाव खेळला.

13 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमारने टोलावलेला चेंडू विराटच्या दिशेने गेला. विराटने तो सहज अडवला. त्यानंतर कोहली सूर्य कुमार जवळ येऊन थांबला. कोणताही शब्द न उच्चारता किंवा त्याच्याकडे न पाहता विराट चेंडूवर डोक्यावरील घाम लावताना दिसला. या घटनेनंतर सूर्यकुमारने शांत राहत कोहलीच्या कृतीकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही विराटशी पंगा घेणं सूर्य कुमारला झेपणार नाही, अशा शब्दांत प्रतिक्रिया देत आहेत. तर काहींना सूर्यकुमारने दाखवलेला संयम भावलेला दिसतोय. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेंडूला लाळ लावणे किंवा घाम लावण्यावर बंधन आहे. तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार चेंडूला घाम लावताना पाहायला मिळाले. टेन्शनमध्ये असल्यामुळे त्याला नियमाचा विसर पडला का? असा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. पण दोघांच्यामध्ये मैदानात दिसलेल्या 'खुन्नस'मुळे ही गोष्ट दुर्लक्षित झाल्याचे दिसते. कोरोनाच्या काळात होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने नियम पाळणे बंधनकारक आहे. पण दबावात आल्यानंतर विराटकडून अनावधानाने पुन्हा एकादा चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. दुसरीकडे सूर्यकुमारने या घटनेनंतर नाबाद संघाला विजय मिळवून देत संयमही विजयाचे द्वार उघडू शकतो हेच दाखवून दिले. सामना संपल्यानंतर त्याने मैदानात केलेले हावभाव हे देखील लक्षेवेधी असेच होते. भविष्यात विराटच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल त्यामुळे देखील त्याने आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे योग्य ठरेल, असा अविर्भाव दाखवला असला तर त्याची परिपक्वता ही वाखाणण्याजोगी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

विराट कोहली हा केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार नाही. तर तो भारतीय संघाचा देखील कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा लीगमधील लढत सामना हातून निसटताना दिसला मैदानात त्याच्या चेहऱ्यावरील निराशा कधीच लपून राहिलेली नाही. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हेच चित्र पाहायला मिळाले. विराट कोहली त्याच्या आक्रमकतेनं ओळखला जातो. सामना जिंकल्यानंतर किंवा प्रतिस्पर्धी संघातील हुकमी खेळाडू बाद झाल्यानंतर तो ज्याप्रमाणे सेलिब्रेशन साजरे करतो ते नेतृत्वाच्या परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची चर्चा यापूर्वी रंगल्याचे पाहायला मिळाले होते. सूर्यकुमारसोबत त्याने केलेल्या कृतीमुळे सोशल मीडियावर यासंदर्भातील प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत. 

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या यापूर्वीच्या साखळी सामन्यात विराट कोहलीच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. या सामन्यातही विराट फंलदाजीमध्ये अपयशी ठरला होता. सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला येऊन त्याने संघाला विजय मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्याने आपल्या तोऱ्यात आनंदही व्यक्त केला होता. मुंबई विरुद्धच्या   स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यात विराटला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. शिवाय संघाला सामना गमवावा लागला. या पराभवामुळे त्यांचे स्पर्धेतील प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे लांबवणीवर पडले आहे. उर्वरित दोन सामन्यातील एका विजयाने ते प्ले ऑफमध्ये पात्र होऊ शकतात. पुढे मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात सामना रंगला तर वातावरण काय असेल? हे देखील पाहण्यासारखे असेल.         
 


​ ​

संबंधित बातम्या