चेन्नईचं काही खरं नाही; सगळा खेळ बेभरवशाचा!

रविराज गायकवाड
Thursday, 8 October 2020

टीम मॅनेजमेंटने धोनीच्या नेतृत्वावर विश्वास टाकत, टीममध्ये फारसे बदल केले नाहीत. सुरेश रैनासारख्या खेळाडूनं ऐन वेळेला स्पर्धेतून माघार घेतली तर, हरभजनसिंगनं स्पर्धा न खेळण्याचा निर्णय पूर्वीच जाहीर केला होता. पण, हे दोघं टीममध्ये असते तर, खूप बदल दिसला असता असे वाटत नाही.

पुणे : तीन वेळा आयपीएल, दोन वेळा चॅम्पियन्स लीग. दोन वर्षांची बंदी. टोकाची लोकप्रियता आणि टोकाचा द्वेष, असे चढ उतार पाहिलेली चेन्नई सुपर किंग्जची टीम आजवरचा सर्वांत खराब परफॉर्मन्स देताना दिसत आहे. कागदावर, सोशल मीडियावर ज्या टीमला वाघ किंवा सिंहाची उमपा दिली जाते. ती टीम मैदानावर मात्र ढेपाळलेली दिसत आहे. चांगल्या स्थितीतून तीन विकेट गमवायच्या आणि मॅच कशी हरायची, हे आज चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दाखवून दिलंय. पॉइंट्स टेबलमध्ये ही टीम तळात गेली होती. बहुदा इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं असावं. चेन्नईची ही कामगिरी क्रिकेट चाहता म्हणून, निश्चितच अस्वस्थ करणारी आहे. या स्पर्धेत धोनीची ही टीम खूप काही चमत्कार करेल, असं वाटत नाही.

एका मॅचमध्ये टीमचे दोन्ही सलामीवीर 10 विकेट्सने मॅच जिंकून देतात तर, दुसऱ्याच मॅचमध्ये मधली फळी कोलमडते आणि टीम कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हातात आलेल्या मॅचवर पाणी सोडते. एकेकाळी धडकी भरवणारी ही टीम आता बेभरवशाची झालीय, हे आता टीमचे चाहतेही मान्य करतील. शेन वॉट्सन, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ब्रावो, धोनी असे एकसे एक 'अनुभवी' बॅट्समन या टीममध्ये आहेत. या बॅट्समनना जर, दबावात खेळतात येत नसेल तर, त्यांचा अनुभव काय कामाचा? प्रश्न केवळ धोनीच्या परफॉर्मन्सचा नाही. हे संपूर्ण टीमचं अपयश दिसत आहे.

खेळातील बदल स्वीकारायला हवेत
 

मुळात कोरोनामुळं यंदाची आयपीएल भारतात नव्हे तर यूएईमध्ये होत आहे. भारतातली मैदानं, तिथली परिस्थिती चाहत्यांचा पाठिंबा ते वातावरण यूएईमध्ये नाही. यूएईतली आयपीएल पाहताना खेळ पूर्णपणे बदलला असल्याचं दिसतंय. या बदलांना चेन्नईच्या टीमनं, धोनीनं कितपत स्वीकारलंय याविषयी शंका वाटतेय. धोनीचा हा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांत वयस्कर संघांपैकी एक आहे. एका बाजूला, संजू समॅसन, शुभमन गील, पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, देवदत्त पडिक्कल, असे अनेक अनेक नव्या दमाचे खेळाडू दमदार खेळ दाखवत असताना, चेन्नईकडून असा एकही खेळाडू आतापर्यंत चमकल्याचं दिसत नाही. मुळात टीममध्ये असे ताज्या दमाचे खेळाडू आहेत किती? हाच खरा प्रश्न आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध पहिल्या बॉलवर केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी एक रनच्या जागी दोन रन घेऊन दाखवल्या. ही मॅच चेन्नईनं जिंकली असली तरी, चेन्नईच्या मर्यादा अशा अनेक प्रसंगांमध्ये स्पष्ट दिसल्या आहेत.

चेन्नई इतिहासातच रमलीय

टीम मॅनेजमेंटने धोनीच्या नेतृत्वावर विश्वास टाकत, टीममध्ये फारसे बदल केले नाहीत. सुरेश रैनासारख्या खेळाडूनं ऐन वेळेला स्पर्धेतून माघार घेतली तर, हरभजनसिंगनं स्पर्धा न खेळण्याचा निर्णय पूर्वीच जाहीर केला होता. पण, हे दोघं टीममध्ये असते तर, खूप बदल दिसला असता असे वाटत नाही. रैनानं थोडं फार योगदान दिलं असतं. हरभजनसिंगकडून मात्र अशी काही अपेक्षा नव्हती. ही आयपीएल आधीच्या सगळ्या सीझन पेक्षा वेगळी आहे, हे समजायला चेन्नईला उशीर झाला की काय? असं वाटावं अशी परिस्थिती आहे. खेळ बदललाय याची उदाहरणं खूप आहेत. म्हणजे, यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्या क्षणाला कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही. या खेळाला अनुभवाची फारशी गरज नाही. मोक्याच्या क्षणी मैदानावर कोण कसा निर्णय घेतो? बॉलर काय करेल? यॉर्कर, लेन्थ बॉल, बॉउन्सर करेल की स्लोअर टाकेल, याचा अंदाज घेऊन त्या त्या वेळी जो उत्तम शॉट सिलेक्शन करतो. तो चमकतो आणि त्या खेळाडूची टीम जिंकते, अस चित्र आहे. किंग्ज इलेव्हन विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्सर मारून राहुल तेवातियानं मॅच फिरवली. राशीद खान चार ओव्हरमध्ये 12 रन्स देऊन मॅच हातात आणून देतो. संजू सॅमसन, मयंक अगरवाल बघत रहावे, असे फटके मारतात. केएल राहुल, श्रेयस अय्यर कॅप्टन्स इनिंग खेळून टीमला एक दिशा देतात. असं कोणतंही चित्र चेन्नईच्या टीममध्ये दिसत नाही. जणू ही टीम आपल्या कोषातून, मोठ्या खेळाडूंच्या प्रेमातून बाहेरच पडलेली नाही. टीम अजूनही मागच्याच सिझनमध्ये वावरत आहे. चेन्नईचे खेळाडू 2020 मध्ये टी-20 खेळात आहेत आणि दुबई, शारजाच्या मैदानांवर खेळत आहेत, असं काही दिसत नाही.

मदार मोठ्या खेळाडूंवरच

चेन्नईनं पहिल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला हरवून गेल्या आयपीएलमधल्या शेवटच्या मॅचमधील पराभवाचा वचपा काढला. राजस्थान विरुद्ध जवळपास सव्वा दोनशेचा पाठलाग करताना, धोनी सातव्या नंबरवर आला. शेवटच्या ओव्हरमध्ये तीन सिस्कर मारून धोनीनं वाहव्वा मिळवली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. धोनीनं असा का निर्णय घेतला असावा? याचं कोडं चाहत्यांना पडलं होतं. त्याला अजून एखाद दुसरी ओव्हर खेळायला मिळाली असती तर कदाचित निकाल वेगळा असता. क्रिकेटमध्ये जर, तरला काहीच अर्थ नसतो. पुढच्या दोन्ही मॅचमध्ये तो सहाव्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळायला उतरलाय. पण, निकाल म्हणून, चेन्नईच्या पदरात निराशाच आलीय. बॅटिंग ऑडरमधल्या चुका कोलकाता नाईट रायडर्सही करत आहेत. तिथं चुका करणारा दिनेश कार्तिक आहे. धोनीकडून तशा चुकांची अपेक्षा अजिबात नाही. एका बाजूला श्रेयस अय्यर, केएल राहूल पुढाकार घेऊन, मोठा स्कोअर करण्यात टीमला मदत करत आहेत. पण, अनुभवाचं गाठोडं असलेला धोनी इथं कमी पडतोय. मुळात टीम एफर्ट फार महत्त्वाचा आहे. हे दिल्ली कॅपिटल, राजस्थान रॉयल्स, सारख्या टीम दाखवून देत आहेत. तिथं मुंबई रोहित, हार्दिक, पोलार्डवर तर, चेन्नई धोनी, ब्रावो, रायडू यांच्या खेळावर अवलंबून असताना दिसत आहे. चेन्नईच्या हातातून स्पर्धा अजूनही गेलेली नाही. टीमच्या खेळात बदल दिसेल आणि पुन्हा ही टीम वर येईल, अशी केवळ आशा करुया. 


​ ​

संबंधित बातम्या