#HappyBirthdayDravid : द्रविडला षटकार मारायला बळ दे; पण चेंडू सोडायची बुद्धी देऊ नकोस!

सुशांत जाधव
Monday, 11 January 2021

छोकरीवर प्रेम अन् नोकरीवर निष्ठा ठेवावी लागते ना; अगदी तसचं सचिनवर प्रेम करताना द्रविडवरची प्रतिष्ठा ही काणाडोळा करण्यासारखी नाही. संयम नक्की कसा असावा याच उत्तम उदाहरण द्रविडशिवाय दुसरं कोणतही असू शकत नाही.

#HappyBirthdayDravid : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 36 धावांत ढेपाळला तेव्हा क्रिकेटमधील अनेक जाणकारांना ज्याची आठवण झाली त्या संयमी आणि कर्तृत्वान क्रिकेटर, कर्णधार, यष्टिरक्षक, मार्गदर्शक आणि एक उत्तम प्रशासक असलेल्या राहुल द्रविडचा आज जन्मदिवस.                    

छोकरीवर प्रेम अन् नोकरीवर निष्ठा ठेवावी लागते ना; अगदी तसचं सचिनवर प्रेम करताना द्रविडवरची प्रतिष्ठा ही काणाडोळा करण्यासारखी नाही. संयम नक्की कसा असावा याच उत्तम उदाहरण द्रविडशिवाय दुसरं कोणतही असू शकत नाही. एकदिवसीय सामन्यात द्रविडची खेळी बघणारा तर परेशान व्हायचाचच पण कदाचित मैलावरून धावत येणाऱ्या त्या रावळपिंडीनेही अल्हाला दुँआ केली असेल की, द्रविडला षटकार मारायला बळ दे; पण चेंडू सोडायची बुद्धी देऊ नकोस!

संघाचं नेतृत्व कोणी करायचं असा मोठा पेच निर्माण झाल्यावर संकटकाळात गळ्यात पडलेली कर्णधारपदाची माळ ज्यानं कोणताही संकोच न करता स्वीकारली तो म्हणजे राहुल द्रविड. ज्यावेळी भारतीय संघ सहा बॅट्समनच्या रणनितीने मैदानात उतरायचा त्यावेळी प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या माऱ्यासमोर भिंत बनून उभे राहणाऱ्या द्रविडला विकेटमागे आपल्या गोलंदाजांचे चेंडू तटवण्याची कसरतही करावी लागल्याचेही क्रिकेट चाहत्यांनी पाहिले आहे. बोर खेळीमुळे बाकावर बसवलेल्या खेळाडूला इंग्लंड दौऱ्यासाठी बोलवणं आलेला कदाचित तो पहिलाच. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची अवस्था केविलवाणी झाल्यावर द्रविडला बोलवण्यात आले होते. सौरव, सचिन द्रविड यांनी एकत्रित मिळून टी-20 क्रिकेट खेळायचं नाही, असा निर्णय घेतल्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. संघ संकटात असताना द्रविड खेळला अन् त्यानं सर्वांची मनं जिंकली. हल्लीच्या क्रिकेटमध्ये संघातून वगळले की ट्विटरवरुन बडबड सुरु होते. तो पिढीचा फरक असो...

एकच हृदय किती वेळा जिंकशील रे...!

अनेकांना त्याची खेळी रटाळ वाटायची. वनडे सामन्यात त्याला कित्येकदा बाहेरही बसावं लागलं. पण जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने आपल्या शैलीत या संधीच सोनं करुन दाखवलं. आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना त्याची गियर बदलण्याची शैली पाहायला मिळाली. त्याच्या कारकिर्दिच्या संयमी प्रवासावर नजर फिरवली तर 2011 च्या विश्वचषकामध्ये सचिनला खांद्यावरून मिरवल्याचे पाहताना द्रविडला पाहण्याची संधी आम्ही गमावल्याची खंत कायमची मनाला टोचत राहिल यात शंका नाही. 

द्रविडला विश्वविजेत्या संघाचे सदस्य होण्याचं भाग्य लाभलं नसलं तरी तरी त्यानं 19 वर्षांखालील भारतीय संघाला विश्वविजेता करुन दाखवण्यात मोलाचा वाटा उचलला. गुरुजी कसा असावा याचं एक अप्रतिम उदाहरणही त्याने 19 वर्षांखालील संघाला मार्गदर्शन करताना दाखवून दिले. भारतीय वरिष्ठ संघाचं प्रशिक्षकपद त्याला सहज मिळाले असते. पण किर्तीवान मूर्ती घडवण्याचा संकल्प घेऊन त्याने ज्यूनियर टीमला मार्गदर्शन करण्याचा वसा  हाती घेतला. आणि तेही लिलया पेलला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केलेले सर्व हिरे त्याच्या खाणीतून निघालेले आहेत. आणखी काही लाईनमध्ये आहेत. भविष्यात त्यांनाही आपण जेव्हा ब्लू जर्सीत पाहू तेव्हा या मूर्तीकाराची आठवण आपल्याला निश्चितच येईल.   

-सुशांत जाधव

Email : sushant.jadhav@esakal.com


​ ​

संबंधित बातम्या