क्रिकेटपटू ऋतुराजच्या आयपीएल कामगिरीने आई वडीलांवर शुभेच्छांचा वर्षाव

रमेश मोरे 
Saturday, 31 October 2020

आयपीएल मधे चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणा-या पुण्यातील जुनी सांगवीचा सुपुत्र ऋतुराज गायकवाड याच्या घरी जावून आई वडीलांकडे सांगवीकर त्याला शुभेच्छा देत आहेत.

पुणे : आयपीएल मधे चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणा-या पुण्यातील जुनी सांगवीचा सुपुत्र ऋतुराज गायकवाड याच्या घरी जावून आई वडीलांकडे सांगवीकर त्याला शुभेच्छा देत आहेत.

IPL 2020 : बंगळूरला प्लेऑफची संधी

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाने हे ऋतुराजचे मूळ गाव. वडील नुकतेच लष्कर सेवेतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले. तर आई शिक्षिका व गृहिणी. आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीने अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन संघातील तरुणांना संधी दिली आणि कर्णधाराने दिलेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत महाराष्ट्राच्या 23 वर्षीय ऋतुराज गायकवाडने सलग दोन सामन्यात अर्धशतक झळकावत स्व:तातील गुणवत्ता सिद्ध केली. आरसीबी आणि केकेआर विरुद्ध सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. धोनीने  देखील त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे. 

सध्या पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी मधूबन येथील मातीत वाढलेल्या या मराठमोळ्या खेळाडूवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. 2016 साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऋतुराजने रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ऋतुराजला देवधर करंडक भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. 2020 सालात ऋतुराजने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. भारतीय संघाकडून खेळताना ऋतुराज ने श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळताना चमकदार कामगिरी केली. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर या सिझनला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला संघात घेतलं. 

यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये  त्याला संधी मिळाली परंतू त्यात ऋतुराज अपयशी ठरला. परंतु सरतेशेवटी आपल्या नैसर्गिक शैलीप्रमाणे संघाकडून सलामीला येताना ऋतूराजने सलग दोन सामन्यात अर्धशतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं. वयाच्या अकराव्या वर्षापासून ऋतुराजने पिंपरी-चिंचवडच्या दिलिप वेंगसरकर अकादमीत प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. युएईत त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. यातून बाहेर येत त्याने संधीचे सोने केले.

IPL2020 : अव्वल स्थान कायम ठेवण्याचे मुंबईचे लक्ष्य

तसेच भारतीय संघात संधी मिळेल अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करीत आहेत. महेंद्रसिंह धोनी, चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी त्याचे कौतूक केले आहे. ऋतुराज सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक असल्याचं क्रिकेट जगतातून बोलले जात आहे. त्याच्या चमकदार खेळीमुळे मधूबन येथील त्याच्या घरी क्रिकेटप्रेमी व सांगवीकर नागरीक भेट देवून अभिनंदन करत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या