अय स्मिथ... वाघासारखा खेळतोस तर त्याच्यासारखं वाग रे बाबा! 

सुशांत जाधव
Tuesday, 12 January 2021

स्मिथ काय गरज होती रे तुला पिचवर उकऱ्या काढण्याची? आमच्याकडे अशा उकऱ्या कोण काढतं हे सांगून तुझा आणि त्या प्राण्याचा मला अपमान करायचा नाही. पण तू विसरलास.

Steve Smith Scuffs Up Rishab Pant Guard Mark :  स्मित हास्य फुलवणारी बहरदार खेळी करण्याची किमया लाभलेल्या महारथींमध्ये अभिमानानं नाव घ्यावा असाच आहेस तू... पण काहीवेळा तू भान विसरुन अशा काही गोष्टी करतोस की, तुझ्या प्रेमात असलेल्या चाहत्याला मानवर काढायला जागा उरत नाही. ग्रीन बॅगीला लागलेल्या डागानंतर एक वर्ष मैदानाबाहेर राहुनही तुझ नाव जेव्हा कसोटी क्रमवारीत टॉपला कायम राहिल्याच दिसलं तेव्हा तुझ्यातील क्षमतेची आणखी एक बाजू उलगडली. दक्षिण आफ्रिकेतला तो काळा दिवस आम्ही अ‍ॅशेस मालिकेतील तुझ्या संघर्षमय खेळीनं विसरायला लागलो होतो. टॉम मूडी यांनी सिडनी कसोटीपूर्वी बंद पिंजऱ्यातला वाघ शिकारीसाठी सज्ज आहे, अशा काहीशा शब्दांत तुझ्यावर विश्वास दाखवला. शतकी खेळीनं हा विश्वास सार्थ करुन तू जिंकता-जिंकता हारलास मित्रा... 

स्मिथ काय गरज होती रे तुला पिचवर उकऱ्या काढण्याची? आमच्याकडे अशा उकऱ्या कोण काढतं हे सांगून तुझा आणि त्या प्राण्याचा मला अपमान करायचा नाही. पण तू विसरलास. ग्रीन बॅगीवरील काळ्या डागानंतरही तुझ्या कारकिर्दीला ग्रहण लागलं नाही. ते केवळ आणि केवळ तुझ्या क्षमतेमुळं. पण तुला त्याची जाणीव आहे का? आयपीएलमध्ये भारतीय संघातील नवोदित खेळाडूंना शॉट कसा बनवायचा असतो हे स्वत: स्ट्रोक खेळून दाखवणारा तू असा कसा वागू शकतोस. अ‍ॅशेस कसोटीत चिटर येताहेत अशा तोऱ्यात तुझं आणि वॉर्नरच स्वागत झालं होतं. या दडपणातही तू स्वत:ला सिद्ध केलस. जायबंदी होऊन शतकी खेळी करुन संघाच्या विजयात तू मोलाचा वाटाही उचललास. पण भारतीय संघाविरुद्ध सिडनी कसोटीत जे काही झालं ते वाघाला शोभणारे कृत्य नव्हते हे निश्चितच. आता तुझा कर्णधार भारतीय टीमने तक्रार बिक्रार करावी ही भाषा करतोय ती तूला पाठिंबा देणारी असली तरी त्यामुळे तू केलंस ते झाकून जाणार नाही, हेही लक्षात ठेव.  

"खाया पिया कुछ नही...गिलास तोडा बाराह आना"; सेहवागचा स्मिथला टोमणा

दक्षिण आफ्रिकेत चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट आणि तू तिघेही दोषी आढळला. आणि तुझ्या खेळीचा फॅन असलेल्या प्रत्येकाला मोठा धक्का बसला. तुझ्या आसवांनी डाग जाणार नाही हे माहित असतानाही तू रडलास. त्यानं तुझ्यावरचा चिटिंगचा डाग जाणारही नाही. पण तू पुन्हा तसाच माती खाण्याचा प्रकार करु नये, अशीच तुझ्या सामान्य चाहत्यांची प्रामाणिक इच्छा म्हण किंवा मत असेल. विराट-विलियमसन यांच्यासोबत तुझी तुलना केली जाते. कसोटीमध्ये तू या दोघांपेक्षा भारी असल्याचेही काहींचे मत आहे. मुळात कोणत्याही एका खेळाडूची दुसऱ्यासोबत तुलनाच होऊ शकत नाही. तुम्ही तिघेही ज्यावेळी थांबाल तेव्हा तुमच्यात कोणाची आकडेवारी भारी यावरही चर्चा होईल. पण ज्यावेळी मैदानात रडीचा डाव खेळणाऱ्यांची यादी काढली जाईल, त्यावेळी तुझं नाव त्यात आघाडीवर असणार नाही, याची काळजी घे बाबा! नाहीतर कितीही जीव तोडून खेळलास तरी तुला कोल्ह्याचीच उपमा दिली जाईल. अन् वाघाला ते शोभणार नाही. 

AUSvsIND 3rd Test: व्वा रे वाघा! जखमी होऊनही कांगारूंना फोडला घाम!
  
खरी कसोटी काय असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिडनीतील सामना होता. या सामन्यानंतर क्रिकेट जगतातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षावर झाला. दुसरीकडे स्मिथचं कृत्य पेन टीमनं विकेटमागून भारतीय खेळाडूंना विचलित करण्यासाठी केलेला व्यर्थ बडबड यामुळे कांगारुंची खूपच नाचक्की झाली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची दिसलेली वृत्ती ही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही यातील होती. तरीही स्मिथनं पुन्हा पुन्हा अशा खोड्या करु नये, असं मनापासून वाटतं.  

-सुशांत जाधव

Email - sushant.jadhav@esakal.com


​ ​

संबंधित बातम्या